Unseasonal Rain In Maharashtra : गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालेलं होतं. हवामान खात्यानं राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानंतर आज दुपारपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड आणि विदर्भातील नागपूर, वर्धा, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपून काढलं आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात गारपीटीसह अवकाळी पाऊस झाल्यामुळं शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं आता आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
गेल्या आठवड्याभरापासून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसानं विभागात हजेरी लावल्यामुळं शेतकऱ्यांच्या कांदा, गहू, मका आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याशिवाय भाजीपाल्यांच्या पिकांचंही नुकसान झाल्यानं बळीराजा संकटात सापडला आहे. नाशिक, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळं आता शेतीपिकांचं नुकसान झाल्यामुळं शेतकऱ्यांना मदतीची मागणी करण्यात येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात तुफान गारपीट...
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये अवकाळी पावसासह तुफान गारपीट झाली आहे. त्यामुळं रस्त्यांसह शेतांमध्ये गारांचा खच साचला होता. त्यामुळं शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुढील आठवड्याभरात राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
संबंधित बातम्या