Maharashtra weather Updates : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून कोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. याचा फटका काजू उत्पादकांना बसणार आहे. पुण्यातही आज सकाळ काही भागात पावसाची रिपरिप झाली. यामुळे रस्ते निसरडे झाल्याने अनेक दुचाकी स्वार घसरून पडले. उद्या देखील राज्यावर पावसाचे सावट आहे.
राज्यावर सोमवारी रात्री पासून ढगांची निर्मिती झाली आहे. पुण्यावर देखील सकाळपासून मोठे ढग आणि धुके दाटून आले आहेत. सोमवारी कोकणात जोरदार पाऊस झाला. मंगळवारी देखील पावसाने हजेरी लावली असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सिंधुदुर्गात सर्वत्र पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. सावंतवाडी आणि कणकवली तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. तर दोडामार्ग तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
रत्नागिरीत काही तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. चिपळूण, संगमेश्वर भागांत सकाळपासून पाऊस सुरु आहे. पसामुळे काही गावात वीजपुरवठा खंडित झाला आहे. पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणात गारठा वाढला आहे. पुण्यात सकाळ पासून पावसाची रीपरीप सुरू आहे. पुण्यातील धायरी, कोथरूड, शिवाजी नगर, बाणेर, सुस, पाषाण, बावधन येथे पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने अनेक वाहने ही घसरून पडली. पुण्यात सोमवार पासून ढगाळ हवामान आहे. आज सकाळी अचानक पावसाच्या काही धारा पुण्यात कोसळल्या. पुण्याच्या वातावरणात मोठा बदल अनुभवायला मिळाला.
आज आणि उद्या देखील पुणे परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी अतिहलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील ७२ तासांत सकाळी हलके धुके पडू शकते. आणि कमाल व किमान तापमानात घट होऊन दिवसाही गारठा जाणवू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. आज ९ जानेवारीला प. महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर १० जानेवारीनंतर राज्यातील हवामान कोरडे राहील, असाही अंदाज हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिला आहे.