मराठवाड्यातील काही जिल्ह्यात सोमवारी गारपिटीचा तडाखा बसल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही राज्यातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळीने झोडपले. मराठवाडा व विदर्भासह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडासह अवकाळीने तडाखा दिला. नाशिक जिल्ह्यात तर पावसाळ्यासारखा पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. या पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाली आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार थैमान घातले. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अन्यत्र मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. या पावसाचा द्राक्ष बागायतदारांना मोठा फटका बसला असून काढणीला आलेली द्राक्षे खराब झाली आहेत. नाशिकच्या नांदगाव तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आता पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात पावसाने आज हजेरी लावली. या अवकाळी पाऊसामुळे रब्बी हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. वर्धा, अमरावती, गोंदिया, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
संबंधित बातम्या