मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nitin Gadkari : नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, आरोपीचा कार्यालयात फोन, पोलिसांची धावपळ

Nitin Gadkari : नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, आरोपीचा कार्यालयात फोन, पोलिसांची धावपळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 21, 2023 01:27 PM IST

Nitin Gadkari Death Threat : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आरोपीनं दोनदा फोन करत गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळं राज्यात खळबळ उडाली आहे.

Nitin Gadkari Death Threat
Nitin Gadkari Death Threat (MINT_PRINT)

Nitin Gadkari Death Threat : केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात आरोपीनं दोनदा फोन करून गडकरींना ठार मारण्याची धमकी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच गडकरींच्या नागपुरातील कार्यालात एका आरोपीनं फोन करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा धमकीचा फोन आल्यामुळं नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून दोन वेळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आरोपीनं अनोळकी नंबरवरून दोनदा फोन करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी गडकरी कार्यालयात नव्हते. धमकीचा फोन आल्यानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाची तातडीनं दखल घेत आरोपीवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. यापूर्वी जयेश कांथा ऊर्फ जयेश पुजारी या आरोपीनं गडकरींना ठार मारण्याची धमकी दिली होती. याच आरोपीनं पुन्हा नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची प्राथमिक माहिती आहे.

केंद्रातील मोदी सरकारमध्ये नितीन गडकरी हे सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. भाजपसह अन्य पक्षातील अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू नेते म्हणूनही गडकरींची ओळख आहे. त्यामुळं आता महाराष्ट्रासह देशभरात मोठा राजकीय प्रभाव असलेल्या मंत्र्याला वारंवार धमकीचे फोन येत असल्यामुळं त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

IPL_Entry_Point