Navneet Rana Death Threat : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका अज्ञात आरोपीने त्यांना फोन करून गर्दीच्या ठिकाणी चाकूने सपासर वार करून ठार मारणार असल्याची धमकी दिली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून आरोपीला तातडीने अटक करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. खासदार नवनीत राणा यांच्या मोबाईलवर विठ्ठलराव नावाच्या व्यक्तीने त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याची माहिती आहे. त्यानंतर आता अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार नवनीत राणा यांचे खाजगी सचिव विनोद गुहे यांनी राजापूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून विठ्ठलराव नावाची व्यक्ती सतत फोन करून नवनीत राणा यांना ठार मारण्याची धमकी देत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. नवनीत राणा गर्दीत आल्यास त्यांच्यावर चाकूने सपासप वार करेन, त्यांची हत्या केली तरी कुणाला माहिती पडणार नाही, अशी धमकी अज्ञात आरोपीने नवनीत राणा यांना दिली आहे. याशिवाय अज्ञात आरोपीने नवनीत राणांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचंही तक्रारीत सांगण्यात आलं आहे.
खासदार नवनीत राणा यांच्या खाजगी सचिवाने दिलेल्या तक्रारीवरून अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी आरोपीवर कलम ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. नवनीत राणा यांच्या खाजगी सचिवाने आरोपीच्या नंबरची माहिती दिली असून त्यानंतर आता पोलिसांनी मोबाईल नंबरच्या आधारावर आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. खासदार राणा यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.