शिवाजी महाराज आमचं दैवत आहे हो; राज्यपालांच्या वक्तव्यानंतर गडकरींनी शेअर केला VIDEO
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक व्हिडीओ शेअर करत सूचक अशी प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यात वाद निर्माण झाला आहे. यावरून विरोधकांनी राज्यपाल बदलण्याची मागणी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. मराठावाडा विद्यापाठातील सोहळ्यात राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची तुलना केली. यानंतर आता पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक व्हिडीओ शेअर करत सूचक अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक ३० सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला असून त्यात म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे हो. आमच्या आई वडिलांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचं जीवन आमचा आदर्श आहे.
“यशवंत! कीर्तिवंत! वरदवंत! सामर्थ्यवंत! जाणता राजा!! निश्चयाचा महामेरु ! बहुत जनासी आधारू ! अखंडस्थितीचा निर्धारु ! श्रीमंत योगी असंही गडकरींनी पुढे म्हटलं आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना नितीन गडकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत असा कॅप्शन दिला आहे.
काय म्हणाले होते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
राज्यपाल म्हणाले होते की, "तुम्हाला कुमी विचारलं की तुमचे आदर्श कोण तर तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही. ते इथेच महाराष्ट्रात तुम्हाला मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाबद्दल बोलतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील. "