Union Minister Nitin Gadkari: ८५ वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. दरम्यान, २०२२ च्या पुरस्कारांचे वितरण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या कामाचे कौतुक केले.
"पत्रकारिता हे एक वृत्त आहे. पत्रकारितेशी प्रामाणिक राहणारे पत्रकार लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहेत. पण आज पत्रकारांना सत्य लिहिण्याची किंमत मोजावी लागते. सत्य अनेकांना प्रिय नाही. मात्र, त्यानंतरही महाराष्ट्रात पत्रकारितेचे व्रत घेऊन पत्रकारिता करणारे पत्रकार आहेत, याचा खूप आनंद होतो. पत्रकारांतीचे एक गुणात्मक परिवर्तन आजही महाराष्ट्रात पाहण्यास मिळते. महाराष्ट्रातील पत्रकार ज्या पद्धतीने काम करतात, ते इतरत्र पाहण्यास मिळत नाही, असे नितीन गडकरी म्हणाले.
"पत्रकारीता लोकशाहीचा एक स्तंभ आहे. लोकशाहीचे ज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचे काम हे पत्रकार करतात. एखाद्या व्यक्तीचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार जेव्हा करतात. तेव्हा ते हजार लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करतात. एखाद्या व्यक्तीचे यश हे हजार लोकांपर्यंत नेण्याचे काम पत्रकार करू शकतात, हे आपण वेळोवेळी पाहिले आहे. त्यामुळेच पत्रकारितेचे व्रत स्वीकारून एक व्रतस्थ पत्रकार म्हणून प्रत्येक पत्रकारांनी काम करावे",'असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
मराठी पत्रकार परिषेदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात यावर्षी 'दर्पणकार' बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना दिला गेला. २५ हजार रुपये रोख मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर, आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार कोल्हापूर लोकमतचे संपादक वसंतराव भोसले यांना, शशिकांत सांडभोर स्मृती पुरस्कार न्यूज १८ लोकमतचे मिलिंद भागवत यांना, प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार सकाळचे मारूती कुंदले यांना, सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार मॅक्स महाराष्ट्रच्या प्रियदर्शनी हिंगे यांना, भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार धुळ्याचे बापू ठाकूर यांना, नागोजीराव दुधगावकर स्मृती पुरस्कार औरंगाबादचे ज्येष्ठ पत्रकार स.सो.खंडाळकर यांना, रावसाहेब गोगटे स्मृती पुरस्कार संगमेश्वरचे जेष्ठ पत्रकार जे. डी. पराडकर यांना, दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार अलिबागचे पत्रकार मोहन जाधव यांना दिला गेला. शिवाय, संतोष पवार स्मृती उत्कृष्ट प्रसिद्धी प्रमुख पुरस्कार धुळ्याचे पत्रकार गोपी लांडगे यांना दिला गेला.