Nitin Gadkari on BJP : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपमध्ये इतर पक्षातून प्रवेश केलेल्या नेत्यांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी या नेत्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणी भाजप नेत्यांनीच कठोर पावले उचलली पाहिजे असं मत गडकरी यांनी मांडले आहे. भारतीय जनता पक्ष हा जोमाने वाढत आहे. मात्र, काही अडचणी निर्माण होत आहे. त्या अडचणी आपणच तातडीने दूर करायला हव्या असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. एका, वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी वरील वक्तव्य केलं.
'मुंबई तक'शी बोलताना नितीन गडकरी यांनी रोगग्रस्त पिकांचे उदाहरण देत कीटकनाशक ांची फवारणी करण्यावर पक्षाने भर द्यावा, असे सांगितले. गडकरी म्हणाले, पिके वाढली की रोगराईही वाढते. भाजपचे पीक खूप मोठे झाले आहे, त्यात चांगल्या धान्याबरोबरच काही रोगट धान्य देखील वाढलं आहे. त्यामुळे अशा आजारी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणे गरजेचे आहे. नवनवे लोक पक्षात येतात, त्यांना विचारधारेचं प्रशिक्षण देणं आणि घडवणं ही आमची जबाबदारी आहे. पण एखादा कार्यकर्ता असं विधान करतो की इतर हजार कार्यकर्त्यांच्या कामावर पाणी फेरलं जातं. कार्यकर्ते घडवायला हवेत आणि त्यांच्यावर संस्कार करायला हवेत असंही गडकरी म्हणाले. भाजपच्या वाढत्या सदस्यसंख्येबरोबरच राजकीय नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या प्रक्रियेवरही लक्ष ठेवावे लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलं आहे. महायुतीअंतर्गत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी) यांच्यासोबत भाजप निवडणुकीच्या रिंगणात आहे.
गडकरी यांनी भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेची तत्त्वे अधोरेखित करत सरकार आणि प्रशासन धर्मनिरपेक्ष असण आवश्यक असल्याच म्हटलं आहे. एक व्यक्ती कधीही सेक्युलर होऊ शकत नाही, पण राज्य, सरकार आणि प्रशासन धर्मनिरपेक्ष असायला हवे.
महाराष्ट्रातील भाजपची कामगिरी आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत घटलेल्या जागांच्या संख्येवर नितीन गडकरी यांनी राज्यातील स्थानिक नेतृत्वाच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला. राज्यात कोणतेही औपचारिक पद नसले तरी गरज पडल्यास मदतीसाठी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात माझी कोणतीही औपचारिक भूमिका नाही. इथले नेते सक्षम आहेत. त्यांना सध्या माझी गरज नाही. पण जेव्हा जेव्हा त्यांना माझी गरज पडेल तेव्हा मी मदतीसाठी उपलब्ध राहीन, असेही गडकरी म्हणाले.