Narayan Rane On Uddhav Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच कोकण दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. या टीकेला भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे हा बेअक्कल माणूस आहे, त्यांचे नाव कशाला काढता, असे म्हणत नारायण राणेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणे यांनी नुकताच पत्रकरांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरेच तुम्ही नाव का काढता, बेअक्कल माणूस आहे. राष्ट्रपती राजवट कधी लावली जाते याचा त्याला ज्ञान आहे का?, त्यामुळे तुम्ही त्याचं नाव घेत अपशकुन करत जाऊ नका असं नारायण राणे पत्रकारांना म्हणाले.
पुढे नारायण राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांना हवे त्या भाषेत मी प्रत्युत्तर देईल, त्यांना माझी क्षमता माहीती आहे. ते माझ्यासमोर येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना काय बघायचे आहे? तो माझा स्पर्धक नाही, मी केंद्रीय मंत्री आहे."
उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना मनोरुग्ण असल्याचे म्हटले होते. यावर नारायण राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरे मनोरुग्ण आहे. मनोरुग्ण सोडा, ते वेडसर आहेत. काहीही बोलत असतात." दरम्यान, शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना मंत्रिपद देण्यासाठी १ कोटींचा धनादेश दिला होता असे वक्तव्य केले होते. याबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले की, "हा गौप्यस्फोट नसून वास्तव आहे. तुम्ही जाऊन तपासा आणि चॅलेंज करा."
दरम्यान, ९ फेब्रुवारी २०२४ रोजी पुण्यात निर्मया बनो या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या हल्लावर नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. निखिल वागळे यांची गाडी फोडली नाही, त्याला चोप दिला आहे. यामुळे फक्त गाडी फोडल्याची म्हणू नका, त्यांना चोप दिल्याचे सांगा. असे काम केल्यावर इतरांचीही दशा तशीच होईल, असे नारायण राणे म्हणाले.