मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amit Shah Mumbai Visit: गृहमंत्री अमित शहा आजपासून मुंबई दौऱ्यावर; बीएमसी निवडणुकीसाठी आखणार रणनिती?

Amit Shah Mumbai Visit: गृहमंत्री अमित शहा आजपासून मुंबई दौऱ्यावर; बीएमसी निवडणुकीसाठी आखणार रणनिती?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 04, 2022 10:09 AM IST

Amit Shah Mumbai Visit Today : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा हे आज मुंबई दौऱ्यावर येणार आहे. ते लालबागच्या राजांचं दर्शन घेण्यासाठी मुंबईत येत असल्याची माहिती समोर येत असली त्यांच्या दौऱ्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

Amit Shah Mumbai Visit Today
Amit Shah Mumbai Visit Today (Amlan Paliwal)

Amit Shah Mumbai Visit Today : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज संध्याकाळपासून मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन घेणार असून सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेणार आहेत. त्याचबरोबर या दौऱ्यात ते प्रदेश सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबई प्रदेश पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. त्यामुळं आता अमित शहा यांच्या दौऱ्यात भाजप मुंबई महापालिका निवडणुकीचा नारळ फोडणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच शहा हे मुंबईत दौऱ्यावर येत असल्यानं त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

मुंबईतील प्रसिद्ध गणपतींचं घेणार दर्शन...

अमित शहा हे २०१७ मध्ये भाजपचे अध्यक्ष झाल्यापासून दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. परंतु गेली दोन वर्ष कोरोना महामारीमुळं गणेशोत्सव साजरा करण्यात आला नव्हता. परंतु यावर्षीचा गणेशोत्सव नियममुक्त आणि निर्बंधमुक्त साजरा होत असल्यानं शहा हे मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहे. याशिवाय ते सिद्धिविनायक गणपतीचंही दर्शन घेणार असल्याची माहिती आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणनिती आखणार?

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपनं तात्काळ संघटनात्मक पातळीवर नव्या नेत्यांनी नेमणूक केली होती. त्यात भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबईचं अध्यक्षपद आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलं होतं. त्यानंतर आशिष शेलार मुंबईतील भाजप मेळाव्यात पक्षाच्या शीर्ष नेत्यांनी मुंबई महापालिका निवडणुक जिंकण्याचं टार्गेट देण्यात आल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता शहा हे मुंबईत येणार असल्यानं मुंबई भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. याशिवाय आगामी महापालिका निवडणूक, वार्डरचना आणि कॅबिनेट विस्तारावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता अमित शहा मुंबई दौऱ्यात बीएमसी निवडणुकीसाठी काय रणनिती आखणार किंवा त्यासाठी भाजप नेत्यांना कोणता कानमंत्र देणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

राज ठाकरेंची भेट घेणार?

गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि मनसेमध्ये युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. याशिवाय मुंबई महापालिकेत भाजपला मनसेची साथ हवी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं आता अमित शहा हे राज ठाकरेंची भेट घेणार का, आणि घेतली तर त्यात काय चर्चा होणार? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

शिवसेनेसाठी शहांचा दौरा डोकेदुखी ठरणार?

बंड झाल्यापासून शिवसेनेला गळती लागली आहे. पक्षातील ४० आमदारांसह १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानं ठाकरेंच्या अडचणी वाढलेल्या आहे. अशातच आता अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर येऊन मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची रणनिती आखणार असल्यानं उद्धव ठाकरेंसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

कॅबिनेट विस्तारावर होणार चर्चा?

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा कॅबिनेट विस्तार झाल्यानंतर जवळपास ४० दिवस कॅबिनेटचा विस्तार करण्यात आला नव्हता. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून नव्या मंत्र्यांना खातेवाटपही करण्यात आलं आहे. परंतु आता अनेकांना मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या कॅबिनेट विस्ताराचे वेध लागलेले आहेत. याशिवाय मंत्रिपद न मिळाल्यामुळं शिंदे गट आणि भाजपमधील काही आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं या मुद्यावरही भाजपच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाच्या तिढ्यावरही होऊ शकते चर्चा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसह इतर सर्व याचिकांची सुनावणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. याशिवाय हे प्रकरण आता विस्तारीत खंडपीठाकडे देण्यात आलेलं आहे. त्यामुळं शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसह सरकारच्या पुढील भविष्याबाबतही अमित शहा यांच्या या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अमित शहा राज्यातील विकासकामांचा आढावादेखील घेणार असल्याची माहिती आहे.

IPL_Entry_Point