मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गृहमंत्री अमित शहा पुण्यात दाखल; मोदींवरील पुस्तकाचं प्रकाशन करत ओंकारेश्वर मंदिरात करणार पूजा

गृहमंत्री अमित शहा पुण्यात दाखल; मोदींवरील पुस्तकाचं प्रकाशन करत ओंकारेश्वर मंदिरात करणार पूजा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 18, 2023 07:33 PM IST

Amit Shah Pune Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तीनदिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नागपुरातील कार्यक्रम आटोपल्यानंतर शहा हे पुण्यात दाखल झाले आहेत.

Union Home Minister Amit Shah Pune City Visit
Union Home Minister Amit Shah Pune City Visit (HT)

Union Home Minister Amit Shah Pune City Visit : राज्यातील सत्तासंघर्षानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. नागपुरातील कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित शहा हे सीमा सुरक्षा दलाच्या विशेष विमानानं पुण्यात दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी शहा यांचं पुण्यात स्वागत केलं आहे. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा पुणे दौरा राजकीयदृष्या महत्त्वाचा मानला जात आहे.

नागपुरातून पुण्यात दाखल झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शहरातील एका कार्यक्रमात काश्मिरमधील शहीद जवानांच्या मुलांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर मोदी-२० या पुस्तकाचं प्रकाशन केल्यानंतर ओंकारेश्वर मंदिरात अमित शहा पूजा करणार आहेत. त्यामुळं पुण्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाऊन गृहमंत्री अमित शहा यांनी हेडगेवार यांच्या स्मृतीस अभिवादन केलं होतं. त्यानंतर आता ते पुण्यात दाखल झाले आहेत.

पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहांचा पुणे दौरा महत्त्वाचा...

येत्या २६ फेब्रुवारीला पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपनं हेमंत रासने यांना कसब्यातून तर चिंचवडमधून आश्विनी जगताप यांना रिंगणात उतरवलं आहे. कसब्यात टिळक कुटुंबियांना उमेदवारी न दिल्यामुळं ब्राह्मण संघटनांनी भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात दाखल झाल्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे.

WhatsApp channel