केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हा पूर्ण अर्थसंकल्प नसून अंतरिम अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून सत्ताधाऱ्यांनी कौतुक केले आहे तर विरोधकांवर टीका होत आहे.
काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे की, सीतारामन शक्तीशालीअसल्याचे वाटत होतं. अंतरिम अर्थसंकल्पात त्यांच्याकडून मोठ्या घोषणा होण्याची अपेक्षा होती. मात्र आता वाटते की, त्यांच्या हातात काहीही नाही. त्यांच्यासमोर जो कागद येतो तो त्या वाचतात. त्याच्या पलीकडे त्यांनाही डोकं वापरण्याची मुभा नाही. अशी जहरी टीका ठाकरू यांनी अर्थमंत्र्यांवर केली आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आजचा अर्थसंकल्प सादर केला आहे. फारच मोघम स्वरूपाचा हा अर्थसंकल्प आहे. मात्र यात प्रत्यक्षात काहीच नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. विद्यार्थी, बेरोजगारांसाठी काहीही ठोस घोषणा केलेली नाही. पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याबाबत काहीही घोषणा नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, कपाशीचा दर आतापर्यंतच्या निचांकी पातळीवर आला आहे. त्यामळे आजचे बजेट फेलिअर बजेट असल्याचे यशोमती ठाकूर यांनी म्हटले.
निवडणूक प्रचारात अयोध्या दर्शनाचा आश्वासन दिले जात होते. मात्र अर्थसंकल्पात त्यासाठी काहीच तरतूद नाही. राज्यातील आशाताई, अंगणवाडी सेविकांचा प्रश्न ज्वलंत असताना त्यांच्यासाठी काहीच दिलं आहे. एकूण या अर्थसंकल्पाने कोणाचेच समाधान झालेले नाही.
दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना दिलासा मिळेल ही अपेक्षा बजेटने फोल ठरवली आहे. सरकारनं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्राप्तिकराच्या दरात किंवा करांच्या टप्प्यांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प होता. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्यानं सरकार सर्वसामान्यांना खूष करणाऱ्या घोषणा करेल अशी चर्चा होती. त्यातही नोकरदारांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, सरकारनं करांच्या दर 'जैसे थे' ठेवले आहेत.