'मर्द को कभी दर्द नही होता,' मी नाटकीपणाने म्हटलं
'पण तुम्ही तर स्त्री आहात.' तिने हसून प्रत्युत्तर दिलं
' स्त्री असले तरी पुरुषाची ताकद आहे माझ्यात, दोन्ही एकवटलं आहे माझ्यात !' मी म्हणाले.
…हा आहे एका फिजिओथेरेपिस्ट बरोबरचा लेखिकेचा संवाद ! इथे मूळ लेखिकेचा परिचय होतो.
खरं तर या पुस्तकातल्या घटनेची मला पूर्वी काहीही माहिती नव्हती. पुस्तक बघितले आणि चाळायला सुरुवात केली. आणि एवढ्या मोठ्या घटनेची आपल्याला माहिती नसावी त्याचे वाईट वाटले. तरीही पुस्तक हातात घेतल्यापासून संपूर्ण सलग बसून वाचावेसे वाटले यात पुस्तकाच्या लिखाणाची ताकद लक्षात येते. पुस्तकाचे नाव आहे ‘अनब्रोकन’, मूळ इंग्रजीत लिहिलेल्या UNBROKEN या पुस्तकाचा मराठी अनुवाद. युरोपात बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सच्या विमातळावर २२ मार्च २०१६ रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटातून बचावलेली मुंबईची तरुणी निधी चाफेकर हिची प्रेरणादायी कथा.
अदम्य इच्छाशक्तीच्या बळावर माणूस काय करू शकतो त्याचं टोकाचं उदाहरण म्हणजे ‘निधी चाफेकर’ होय ! ..... ह्याच पुस्तकाच्या लेखिका आहेत. चाफेकर या स्वतः जेट एअरवेज विमानकंपनीत त्यावेळी केबिन क्रु मॅनेजर म्हणून कामाला आहेत. फ्लाईट अटेंडंट हे त्यांच्या कामाचे स्वरूप. निधी चाफेकर यांनी लिहिलेले मूळ इंग्रजी पुस्तक २०२० साली प्रकाशित झाले होते. या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ शुचिता नांदापुरकर - फडके यांनी केले आहे.
मूळ इंग्रजी पुस्तक मी वाचलेले नाही. परंतु मराठी अनुवाद वाचताना भाषांतरित प्रत वाचतोय आहे असं अजिबात जाणवलं नाही, इतकं प्रवाही आणि सुंदर भाषांतर केलंय. पुस्तकाचा रूपबंध (Form) दैनंदिनी स्वरूपातला आहे.
बाँबस्फोट झाल्यापासून लेखिका स्वतःच्या पायावर चालायला लागेपर्यंतची रोजनिशी पुस्तकात लिहिली आहे. बॉम्बस्फोटात सापडलेल्या निधी चाफेकर यांना काय झालं नाही? बॉम्बस्फोटात त्या वीस टक्के भाजल्या गेल्या, त्यांची अनेक हाडे मोडली, काही हाडांचा चुराडा झाला, कानाचे पडदे फाटले आणि सलग तेवीस दिवस Induced Coma मध्ये राहावं लागलं..... यातून त्या कशा सावरल्या त्याची ही कहाणी आहे. त्यांच्या कमालीच्या हिमतीचं आणि इच्छाशक्तीचं दर्शन हे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवतं. परिस्थिती कितीही विपरीत असली तरी त्यावर मात करण्याची क्षमता मानवात आहे असा संदेश देणारं हे पुस्तक कमालीचं वाचनीय आहे. वैद्यकीय इलाज घेतानाचे अनुभव असल्याने वैद्यकीय शास्त्रातले शब्द येणं स्वाभाविक आहे तरीही वाचताना कुठेही अडत नाही किंवा क्लिष्टता नाही.
अपघात झाल्यावर केवळ तीन महिन्यात ही बाई आपल्या अनुभवाचे कथन आपल्या सहकाऱ्यांसमवेत तासभर करते हे अकल्पित वाटतं पण सत्य आहे. आजची मूळ लेखिकेची स्थिती काय आहे? त्यांना एअर कंपनीने कामावर घेतलं का? घेतलं असेल तर कामाचे स्वरूप काय दिलं असेल? हे प्रश्न मनात आले ते अनुत्तरित राहतात. असो.
या पुस्तकात अनेक वाक्ये सुविचार म्हणून आलेली असली तरी ते वास्तव आहे. मलपृष्ठापासून सुरुवात होते ती अर्नेस्ट हेमिंग्वे याच्या वाक्यापासून..... ह्या वाक्याला महत्त्व अशासाठी आहे की युद्ध वार्ताहर म्हणून हेमिंग्वे अशा अनेक घटनांना सामोरा गेलाय. ‘हे जग प्रत्येकालाच मोडतं आणि त्यानंतर त्या मोडलेल्या ठिकाणीच काही जण अधिक सामर्थ्यवान होतात.’
सुप्रसिद्ध कवी शेली यांनी लिहिल्याप्रमाणे, 'कडक हिवाळा दारात उभा आहे म्हणजेच वसंत आता फारसा दूर नाही. तेव्हा अथक परिश्रम थांबवू नका.'
'कुणी आपला एक डोळा काढला तर त्या बदल्यात त्याचाही आपण डोळा फोडला तर जग आंधळं होईल'.... म.गांधीजी
स्टिव्ही वंडर यांनी म्हटल्याप्रमाणे,' आपल्या सर्वांत क्षमता असतात, त्याचा वापर कोण कसा करतो यात भेद असतो.'
ह्या व्यतिरिक्त पान क्रमांक १६१ (जीवनतत्त्व), १७६-१७७ वर असलेला दुर्गामाता मंदिरातील गुरुजींबरोबरचा संवाद आणि माध्यम मुलाखतीतून लेखिकेच्या एकुणच वैचारिक बैठकीची (ठामपणा) कल्पना येते ती वाचकांना विचार करायला प्रवृत्त करेल.
पुस्तकाचे नाव- अनब्रोकन
प्रकाशक - मंजुल पब्लिशिंग हाऊस ,पुणे
मूळ लेखिका - निधी चाफेकर
अनुवाद - डॉ शुचिता नांदापुरकर-फडके
पृष्ठ संख्या - २८०
किंमत - रु. ५९९
संबंधित बातम्या