मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kupwad Sangli : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर दुसरी कारवाई; अनाधिकृत प्रार्थनास्थळाचं बांधकाम हटवलं

Kupwad Sangli : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर दुसरी कारवाई; अनाधिकृत प्रार्थनास्थळाचं बांधकाम हटवलं

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 23, 2023 06:59 PM IST

Mangalmurthy Colony Kupwad : राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर सांगलीच्या कुपवाड शहरातील वादग्रस्त बांधकाम हटवण्यात आलं आहे.

Unauthorized Construction In Mangalmurthy Colony Kupwad
Unauthorized Construction In Mangalmurthy Colony Kupwad (HT)

Unauthorized Construction In Mangalmurthy Colony Kupwad : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडव्याच्या सभेतून राज ठाकरे यांनी राज्यातील अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर माहीममधील वादग्रस्त दर्ग्याचं बांधकाम तोडण्यात आलं आहे. त्यावरून राजकीय वादंग पेटलेलं असतानाच आता सांगली जिल्ह्यातील कुपवाड शहरातील एका वादग्रस्त प्रार्थनास्थळाचं बांधकाम हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कुपवाडच्या मंगलमूर्ती कॉलनीत शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्रार्थनास्थळ बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेनी हे बांधकाम पाडण्याचा इशारा सरकारला दिला होता. त्यानंतर आता स्थानिक प्रशासनाकडून पाडकाम बांधकाम पाडण्यात आलं आहे.

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेनं कुपवाडच्या मंगलमूर्ती कॉलनीत सर्वेक्षण केल्यानंतर प्रार्थनास्थळाचं बांधकाम अनाधिकृत असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित प्रार्थनास्थळाच्या विश्वस्तांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकानं सायंकाळी अवैध बांधकाम हटवण्यास सुरुवात केली. प्रशासनानं या अनाधिकृत बांधकाम काढलं नाही तर मनसैनिक हे बांधकाम पाडतील, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. यावेळी कुपवाड शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कुपवाडच्या मंगलमूर्ती कॉलनीत अनाधिकृत जागेवर प्रार्थनास्थळ उभारण्याच्या कारणावरून तेथील स्थानिक नागरिक आणि विश्वस्त यांच्यात मोठा वाद झाला होता. या प्रकरणात हाणामारीची घटनाही समोर आली होती. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पाडव्याच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या जागेचा मुद्दा उपस्थित करत शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर आता पालिकेकडून अनाधिकृत बांधकाम हटवण्यात आलं आहे.

WhatsApp channel