गेल्या जवळपास १४ वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या महामार्गाच्या कंत्राटदार कंपनीवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत या प्रकरणात पहिली अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या आदेशानंतर ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाची ठेकदार चेतक इंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हुकुमीचंद जैन,जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह आणि प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कांबळे यांच्याविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात समन्वयक अभियंता सुजित कांबळे यांना पोलीसांनी अटक केली आहे.
या महामार्गाचे काम गेली १४ वर्षे रखडले आहे. त्यामुळे कोकण वासियांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर ते वडपाले दरम्यान महामार्गाचे काम दर्जाहीन, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा असल्याचे समोर आले होते. या मार्गावरवाहनांचे अपघात होवून प्रवाशांच्या मृत्यूस व दुखापतीस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेकेदारावर ठेवण्यात आला आहे. २०२० पासून या मार्गावर १७० अपघात झाले असून यात ९७ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे, तर २०८ प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत.
रायगडचेपोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की,इंदापूर ते वडापळे या २६.७ किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम केंद्र सरकारने चेतक एंटरप्रायझेस लिमिटेड आणि ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाला जून ते डिसेंबर २०१७ या कालावधीत दिले होते. यापैकी ९१.८० टक्के रक्कमही सरकारने संबंधित कंपनीला हस्तांतरित केली आहे. महामार्ग विस्तारीकरणाच्या कामासाठी लागणारी जमीनही अधिगृहित करण्यात आली होती. हे काम ठेकेदाराने दोन वर्षात पूर्ण करायचे होते. मात्र ही मुदत संपूनही ठेकेदाराने दरमहा १० टक्के दराने काम पूर्ण केले नाही. कंत्राटदाराला महामार्ग प्राधिकरणाने तीन वेळा कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच मुंबई गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Highway)कामाचापाहणी दौरा करत गणेशोत्सवाच्या आधी काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. तसेच बेजबाबदार ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. महामार्गाचं काम करताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेअॅक्शन मोडवर आले आहेत.महामार्गावर जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या आहेत. आपल्या पाहणी दौऱ्यात गणेशोत्सवपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
महामार्गावरील अपघातास ठेकेदार जबाबदार असून त्यांना जेलमध्ये टाका,बेजबाबदार ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित यंत्रणेला दिले होते. दोषींवर ३०२चा गुन्हा दाखल करा आणि त्यांना तुरुंगात टाका, लोकांपर्यंत योग्य तो मेसेज गेला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.