यूक्रेनची गायिका उमा शांती हिच्यावर तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. पुण्यातील लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तिने तिरंगा ध्वज फिरकावून दिल्याचा आरोप होत आहे. पुणे पोलिसांनी उमा शांती आणि अन्य एका व्यक्ती विरोधात एफआयआर दाखल केला आहे. मंगळवारी पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, स्वतंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला (१४ ऑगस्ट) पुणे शहरातील मुंडवा परिसरात एका रेस्टोरंट व बारमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भारतीय राष्ट्रध्वजाची विटंबना करण्यात आली आहे.
उमा शांतिचा ' शांति पीपल'नावाने बँड आहे. हा बँड वैदिक मंत्रांसोबत EDM (इलेक्ट्रॉनिक डान्स म्यूझिक) सादर करतो. उमा शांतीचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये ती दोन्ही हातांनी भारतीय ध्वज फडकवताना दिसत आहे. तिच्यासमोर लोकांची गर्दी आहे. त्यानंतर ती आपल्या हातातील झेंडा समोर लोकांच्या दिशेने भिरकावून देते. सोशल मीडियावर एका युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
आयोजक आणि सिंगरला बजावले नोटीस -
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार,पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की,'सिंगर शांती संगीत कार्यक्रमात तिरंगा हातात घेऊन फटकवत होती. अचानक तिने ध्वज प्रेक्षकांच्या दिशेने भिरकावला. तिच्याशिवाय कार्यक्रमाचा आयोजक कार्तिक मोरे याच्या विरोधातही तिरंग्याचा अपमान केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, सिंगर आणि कार्यक्रमाच्या आयोजकांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.