Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी युक्रेनच्या एका अभिनेत्याला मालाडमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे बनावट जन्मदाखला होता आणि त्याआधारे त्याने भारतीय असल्याचा दावा केला होता’, अशी माहिती मुंबई पोलिसांनी मुंबई सत्र न्यायालयात दिली आहे.
२६ जानेवारी रोजी लोणावळा येथे तौसिफ रियाजला अटक केल्यानंतर अतायनचे नाव पुढे आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. रियाज ऊर्फ जॉन कार्टर हा टॉरेस ज्वेलरी ब्रँडची मालकी असलेल्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) होता.
पोलिसांनी सांगितले की, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये रशियन किंवा युक्रेनियन म्हणून किरकोळ भूमिका साकारण्यासाठी अतायनला कामावर घेण्यात आले होते. तो दोन रशियन नागरिकांसोबत मुंबईतील मढ येथे राहत होता. हे सर्व जण चित्रपटसृष्टीत काम करतात, अशी माहिती ईओडब्ल्यूचे पोलिस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली.
ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अतायन हा आरोपींच्या यादीत नव्हता, परंतु त्याने मुख्य आरोपीला प्लॅटिनम हर्न स्थापन करण्यास मदत केली होती. देश सोडून पळून गेलेल्या आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या युक्रेनच्या नागरिकांशी अतायनने रियाजची ओळख करून दिल्याचेही आम्हाला समजले. फेब्रुवारी २०२३ मध्ये युक्रेनियन, रियाझ आणि इतरांची पहिली बैठक झाली होती. त्याने युक्रेनियन नागरिकांची ओळख एका चार्टर्ड अकाउंटंटशी करून दिली, ज्याने प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची भारतात नोंदणी करण्यास मदत केली. अतायन देखील त्यांच्या संपर्कात होता, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, अतायन तपासात सहकार्य करत नव्हता. त्याने तो भारतीय नागरिक असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, तपासात त्याचा एकही नातेवाईक भारतात सापडला नाही. त्याचा जन्मदाखला बनावट असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्याची खातरजमा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला देखील संपर्क साधला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अतायनला ३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई आणि आजूबाजूच्या स्टोअर्सच्या माध्यमातून फसव्या गुंतवणुकीच्या योजनांद्वारे शेकडो छोट्या गुंतवणूकदारांना आकर्षित करणारा टोरेस घोटाळा ६ जानेवारी रोजी उघडकीस आला. यात अनेक युक्रेनियन नागरिक व एका तुर्कीतील आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. हे सर्व जण देश सोडून पळून गेले आहेत.
ईओडब्ल्यूने प्लॅटिनम हर्नच्या संचालिका ओलेना स्टोयन, व्हिक्टोरिया कोवालेंको, ओलेक्सांद्र बोरोविक, ओलेक्सांद्र झापिचेन्को, ओलेक्सांद्रा ब्रुन्किव्स्का, ओलेक्सांद्रा ट्रॅडोखिब, आर्टेम ओलिफरचुक, लुरचेन्को इगोर आणि मुस्तफा काराकोक यांच्याविरोधात लुकआऊट नोटिस आणि ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरा तुर्कीचा नागरिक आहे, तर उर्वरित युक्रेनियन नागरिक आहेत.
त्यापैकी बहुतांश जण २९ डिसेंबरपर्यंत पोलंडमार्गे भारतातून पळून गेल्याची माहिती मिळाली आहे. पोलंड आणि युक्रेनच्या सीमा लागून आहेत. आम्हाला संशय आहे की त्यांनी युक्रेनमध्ये पोलंड मार्गे प्रवेश केला. ते पळाल्यावर हा घोटाळा उघडकीस आला,' अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
संबंधित बातम्या