Uddhav Thackeray on Amit Shah : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. यावेळी भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज म्हणजे अमित शाह. तो देखील शाहाच होता, हे देखील शाहच आहेत. अशा शब्दात अमित शहांवर उद्धव ठाकरेंनी हल्ला चढवला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पुण्यात भाजपचा एक कार्यक्रम झाला. इतिहासात जर डोकावून पाहिले तर समजतं की, पुण्यावर शाहिस्तेखान चाल करून आला होता. मात्र शाहिस्तेखान जरा हुशार होता, असं म्हणावं लागेल. त्यामुळेच त्याचं बोटावर निभावलं. तीन बोटं कापली गेल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात नाही आला. त्यातनं काही शहाणपण घेण्याची गरज होती. ते घेतलं असतं तर पुन्हा महाराष्ट्रात आले नसते. पण ते परत का आले? महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या फटक्यांचे वळ कुणाकुणाच्या अंगावर उमटले हे पाहण्यासाठी ते आले. अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज हा पुण्यात आला होता. तो अहमद शाह होता आणि हे अमित शाह आहेत. अहमद शाहचा राजकीय वशंच इथे वळवळायला आला होता. नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खाणाऱ्यांकडून आता आम्ही हिंदुत्व शिकायचं का? अशी टीका उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर टीका केली.
काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर पुन्हा निशाणा साधला. मी परवा शिवसैनिकांसमोर बोलताना म्हटले की, एक तर तू राहशील किंवा मी राहील. पण मी कोणा व्यक्तीला म्हटले नसून पक्षाला म्हटले होते. माझ्या पायाशी कलिंगड ठेवलं आहे. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. पण मी ढेकणांना आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण. मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा पक्ष. मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणं चिरडायची असतात. कुणीतरी हे आव्हान स्वतःवर घेतलं. त्यानं सांगितलं माझ्या नादाला लागू नका. मी म्हणतो, तुझ्या नादाला लागण्याएवढ्या किंमतीचा तू आहेस तर का? अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
अयोध्येतील राममंदिराला गळती लागली, नवीन बांधलेली संसद गळायला लागली. ज्याने संसदेचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते तोच पुण्यामधील नदी बुजवत असल्याची माहिती आहे. यांचं सगळं गळतंय. पेपर लीक होतायेत, संसद गळतेय. याला गळती सरकार म्हणायचे नाही तर काय म्हणायचे मुनगंटीवारांनी लंडनहून वाघनखं आणली. पण नखाच्या मागे वाघ असतो तेव्हा त्या वाघनखांना अर्थ असतो. त्या नखांच्या मागे मुनगंटीवार असतील तर ते कुठेतरी जुळत आहे का? महाराष्ट्रातील वाघनखे ही महाराष्ट्राची जनता आहे, असा खोचक टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.