मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena Symbol : मी स्वत: मशाल चिन्हावर जिंकलोय; आता उद्धव ठाकरे इतिहास घडवतील, भुजबळांचा दावा

Shiv Sena Symbol : मी स्वत: मशाल चिन्हावर जिंकलोय; आता उद्धव ठाकरे इतिहास घडवतील, भुजबळांचा दावा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 11, 2022 12:45 PM IST

Chhagan Bhujbal Press Conference Today : छगन भुजबळ हे शिवसेनेत असताना मशाल चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी तो किस्सा सांगताना उद्धव ठाकरेंबाबतही मोठं विधान केलं आहे.

Chhagan Bhujbal Press Conference Today
Chhagan Bhujbal Press Conference Today (HT)

Chhagan Bhujbal Press Conference Today : निवडणूक आयोगानं शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवलं असून आता ठाकरे गटाला 'शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे', असं नाव दिलं आहे. याशिवाय शिंदे गटालाही 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव देण्यात आलं असून शिंदे गटाच्या चिन्हाचा फैसला आज होणार आहे. परंतु आता ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी त्यावर भाष्य करत उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे.

माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मी शिवसेनेत असताना अनेकवेळा मला अटक झाली, पोलिसांच्या शिव्या खाल्ल्या. आंदोलन आणि त्यात छगन भुजबळ नाही, असं कधी झालं नाही. परंतु आता उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह देण्यात आलंय आणि त्यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीनंही पाठिंबा दिल्यानं ते अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणुकीत सहज विजयी होऊन इतिहास रचतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

१९८५ साली कम्यूनिस्ट आमदार कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मला उमेदवारी मिळाली. त्यात मलाही मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं. त्या निवडणुकीत मी विजयी झालो होते. त्यानंतर मनपा निवडणुकीत काही तरी ७४ नगरसेवक निवडून आले. त्यामुळं बाळासाहेबांनी मला महापौर केलं. त्यामुळं मी शिवसेनेचा पहिला आमदार आणि पहिला महापौर ठरलो होतो, असंही राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी सांगितलं.

शिवसैनिक म्हणून मनाला त्रास होतो...

गेल्या दोन-चार महिन्यांपासून जे काही घडतंय ते पाहून माझ्यासह अनेक शिवसैनिकांच्या मनात वेदना होत आहेत. शिवसेना पाहिजे, शिवाजी पार्क मैदान पाहिजे आणि आता चिन्हांवरही शिंदे गटानं दावा ठोकलाय, आता तो वाद दिल्लीपर्यंतही गेला, त्यामुळं ज्या लोकांनी शिवसेनेसाठी रक्त आटलं, रात्रंदिवस एक केलं, काहींनी बलिदान दिलं. त्यांना काय वाटत असेल?, शिवसेनेच्या नावाला आव्हान देण्याचा प्रयत्न हा मनाला क्लेश देणारा असल्याचं वक्तव्य भुजबळांनी केलं.

WhatsApp channel