Uddhav Thackeray Shiv Sena UBT: विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. ठाकरेंच्या शिवसेनेला अवघ्या २० जागा मिळाल्या. विधानसभेत चारी मुंड्या चीत झाल्यानंतर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे गटासाठी एक संधी आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी तयारी सुरू केली असून आज पदाधिकारी व माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महापालिका निवडणुकीतील रणनिती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने जनतेपासून पोहोचवा. शिवसेना हिंदुत्वासाठीआधीही लढत होती व पुढेही लढत राहणार. आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्याला योग्य तो प्रतिवाद करा', अशा सूचना उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना म्हणाले.
निवडणुका कधीही लागतील त्यामुळे गाफील राहू नका. पुन्हा लोकांमध्ये जा आणि नव्याने ताकतीने कामाला लागा. मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे. ईव्हीएमचा मुद्दा तर आहेच मात्र त्याबाबत नंतर बघू. संघटनात्मक बांधणी करून ताकतीने कामाला लागा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे या बैठकीत म्हणाले, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत भाजप एकनाथ शिंदेना गोंजारेल. निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचेय ते शिंदेंच्या बाबतीत करेल. सध्या सुरु असलेल्या सत्तास्थापनेत एकनाथ शिंदेंच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती आहे. काहीही करून भाजपला मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून कंबर कसली आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरे गटाकडून लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबिर बोलावण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील गटप्रमुखांचेही शिबिर आयोजित केले जाईल, अशी माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईतील सर्व ३६ विधानसभा मतदारसंघातील २२७ प्रभागात तयारीला सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या