Uddhav Thackeray On operation tiger : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या ऑपरेशन टायगरची जोरात चर्चा सुरु आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांनी तर केवळ ६ नाही तर ठाकरे गटाचे सर्वच खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. यावर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यकाळातील कामकाजाचा शिवबंधन कार्यअहवाल प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, आजच मी बातमी पाहिली शिवसेनेचे सहा खासदार शिंदे गटात जाणार. आता तुम्ही पुढे पुढे करून दाखवा तुमचं डोकं फोडू.. तुमच्या सर्व यंत्रणा बाजूला ठेवा. पोलीस बाजूला ठेवा आणि मर्दाची अवलाद असाल तर माझा एकतरी शिवसैनिक फोडून दाखवा. इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय अशी भीती दाखवायची पैशाचे अमिष दाखवायचं, ही कसली अवलाद. संपूर्ण देशाची वाट लावून टाकली. मला तुमच्याकडे बघून समाधान वाटते की कोणीही कितीही फोडाफोडी केली, तरी जो अस्सल शिवसैनिक आहे त्या तटबंदीला जरा सुद्धा तडा पडलेला नाही.आज सुद्धा सुरज हा साधा शिवसैनिक आहे, त्याला काय दिलं असतं.. म्हटलं असतं तर भाजपमध्ये जाऊ शकला असता किंवा मिंधेकडे गेला असता...आपण त्याला काय दिलं?
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाकुंभातील स्नानावरूनही जोरदार टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलेटप्रूफ जॅकेट घालून गंगा स्नान केलं असं म्हणतात. एकेकाळी मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते तेव्हा हे बोलत होते की पंतप्रधान रेनकोट घालून आंघोळ करतात. ते भाविक असतील त्यामुळे त्यांच्या श्रद्धेला मी तडाखा मारत नाही. पण गंगेत डुबकी मारताना आपला रुपया सुद्धा डुबतो आहे याच्याकडे सुद्धा त्यांचे लक्ष असेल तर बरं.
संबंधित बातम्या