लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आज मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम पार पडला. या वर्धापन दिनानिमित्त जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी भाजप, देवेंद्र फडणवीस, मोदी तसेच शिंदे गटावर जोरदार टीका केली. शिवसेनेचं नाव,पक्ष चिन्ह न वापरता येणाऱ्या निवडणुकीत लढून दाखवा, असं खुलं चॅलेंज उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं. तसेच राज ठाकरेंवर पहिल्यांचा जाहीर सभेतून हल्लाबोल केला.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हजारो शिवसैनिक उपस्थित होते. उद्धव ठाकरे नको म्हणून काही जणांनी उघड म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला,असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर लगावला.
शिवसेनेचा आज ५८ वर्धापन दिवसहोता.या निमित्ताने ठाकरे गटाचा आज मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात मेळावा पार पडला. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी धडाकेबाज भाषण करत राज ठाकरेंसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पुन्हा एनडीएसोबत जायचं का?असा उपरोधिक प्रश्न विचारला.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आपला एकही उमेदवार न उभा करता एनडीएला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याववरून उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण हे स्पष्ट झालं आहे. उध्दव ठाकरे नको म्हणून काही लोकांनी उघडपणे म्हणजेच “बिनशर्ट” पाठिबा दिला, असा टोला राज ठाकरेंना लगावला.
आमच्या विरोधात चुकीचा प्रचार शहरी नक्षलवाद्यांनी केला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते, त्याला प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्तेचा दुरुपयोग करून पक्ष फोडणं, सरकारी यंत्रणा हाताशी धरून विरोधकांना संपवणं हा शासकीय नक्षलवाद आहे. मिंदे आणि भाजपला माझे सांगणे आहे, तुम्ही जर षंड नसाल तर तुम्ही बाळासाहेबांचा फोटो न लावता, धनुष्यबाण हे चिन्ह व शिवसेना पक्षाचे नाव न लावता निवडणूक लढा. माझ्या वडिलांचा फोटो वापरता आणि मला स्ट्राइक रेट सांगतात. मिंदेच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणूक लढवा
भुजबळ शिवसेनेत येणार अशी पुडी सोडली गेली. भुजबळ तुमच्याशी काही बोलले का. माझ्याशी बोलले का . मी त्यांच्याशी बोललो का, मग कशाला उचापती करता?, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भुजबळांच्या पक्षप्रवेशाची शक्यता फेटाळली.
शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे म्हटलं गेलं. मुस्लिम मते मिळाल्याचं म्हणातात. शिवसेनेला सर्व देशभक्तांची मते मिळाली आहे. काँग्रेस सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडल्याचा प्रचार केला गेला. मी हिंदुत्व सोडलं नाही. देशभक्तांनी संविधान आणि देश वाचवण्यासाठी मला मतदान केलंय. मी हिंदुत्व सोडलंय मुसलमानांच्या बाजूने लागलोय असं वाटत असेल तर मोदींनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केली.
ज्या ज्या देशभक्तांनी महाविकास आघाडीला मतदान केलं आशीर्वाद दिलं. त्यात दलित मुस्लिम, बौद्ध ख्रिश्चन आले शीखही आले. सर्वांना धन्यवाद देतो, असे ठाकरे म्हणाले.
केंद्रातील सरकार फार काळ चालेल असं वाटत नाही.मध्यावधी निवडणूक लागली तर आपले शिलेदार खासदारहोतील. हे सरकारचालू नये असंच वाटतं. पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजे. पडलं तर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करू, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनीव्यक्त केला.