अदानीचं नाव घेतलं की विरोधकांवर कोसळणारे भाजपवाले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या अमित शहांचं काय करणार?; उद्धव ठाकरेंचा सवाल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अदानीचं नाव घेतलं की विरोधकांवर कोसळणारे भाजपवाले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या अमित शहांचं काय करणार?; उद्धव ठाकरेंचा सवाल

अदानीचं नाव घेतलं की विरोधकांवर कोसळणारे भाजपवाले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या अमित शहांचं काय करणार?; उद्धव ठाकरेंचा सवाल

Dec 18, 2024 04:08 PM IST

Uddhav Thackeray On Amit Shah Comment : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अमित शहा यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. तसंच, भाजप व आरएसएसनं यावर खुलासा करायला हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या अमित शहांवर भाजप काय कारवाई करणार?; उद्धव ठाकरेंचा सवाल
आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या अमित शहांवर भाजप काय कारवाई करणार?; उद्धव ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray Latest News in Marathi : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून सध्या गदारोळ सुरू आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत आरएसएस व भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ‘अदानीचं नाव घेतलं की विरोधकांवर कोसळणारे भाजपवाले डॉ. आंबेडकरांच्या अपमानावर गप्प का? भाजप अमित शहांवर काय कारवाई करणार,’ असा सवाल उद्धव यांनी केला.

संसदेत विरोधकांना उद्देशून बोलताना अमित शाह यांनी नुकतंच एक विधान केलं. 'आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर बोलण्याची हल्ली फॅशन आली आहे. इतक्या वेळा देवाचं नाव घेतलं असतं तर सातही जन्मात स्वर्ग लाभला असता, असं शाह म्हणाले. त्यावरून ते अडचणीत आले आहेत. विरोधकांनी भाजपला हल्ला चढवला आहे. अमित शहा यांनी देशाची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनीही आज भाजपवर हल्ला चढवला. 'महाराष्ट्राच्या दैवतांचा भाजपचे लोक सातत्यानं अपमान करत आले आहेत. महाराष्ट्र यांना खतम करायचा आहे. आपल्याखेरीज दुसरा कोणी देशात जन्मालाच आला नव्हता असं यांना भासवायचं आहे. याआधी आपल्याकडं कोश्यारी नावाचे एक राज्यपाल होते, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या विषयी अनुद्गार काढले होते. मात्र भाजपनं कधीही त्यांच्यावर कारवाई केली नाही. आता खुद्द देशाच्या गृहमंत्र्यानं आंबेडकरांविषयी हिणकस विधान केलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'आतापर्यंत भाजपवाले संसदेत पंडित नेहरु यांच्यावर टीका करायचे, आता यांची मजल आंबेडकरांपर्यंत गेली आहे. आंबेडकरांच्या विषयी भाजपवाल्यांच्या मनात जे काळं आहे, ते यानिमित्तानं बाहेर आलं आहे. आरएसएस आणि भाजपनं सांगितल्याशिवाय अमित शहा आंबेडकरांविषयी असे अपमानास्पद उद्गार काढणारच नाहीत. कारण आपण कुठं बोलतो आहोत हे त्यांना माहीत आहे. त्यामुळं भाजप आणि आरएसएसनं आता यावर खुलासा केला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मिंधे, अजित पवार, आठवलेंना हे मान्य आहे का?

डॉ. आंबेडकर यांच्याविषयी अमित शहा यांनी काढलेले उद्गार एकनाथ शिंदे, अजित पवार आणि रामदास आठवले यांना मान्य आहे का, याचं उत्तर त्यांनी द्यावं, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं. भाजप अमित शहांवर काही कारवाई करणार आहे का,' असा थेट सवालही उद्धव यांनी केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या