Badlapur School Case: बदलापूरमधील विद्यालयातील चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. मंगळवार (२० ऑगस्ट) सकाळी ११ वाजेल्या पासूनच संतप्त आंदोलकांनी संबंधित शाळेची तोडफोड करत बदलापूर स्थानकावर रेल रोको आंदोलन केलं. यावेळी हिंसक झालेल्या जमावानं रेल्वे स्थानकात पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. आता या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या शाळेच्या संचालकपदी भाजपचा कार्यकर्तो असल्याचं मोठं विधान केलं आहे.
बदलापूर मधील ज्या शाळेत ही संतापजनक घटना घडली ती शाळा भाजपशी संबंधित लोकांची आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 'मातोश्री'येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, की एका बाजूने आपण राज्यात लाडकी बहीण योजना आणत असतानाच आपल्या राज्यात या लाडक्या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या-छोट्या मुलीही असुरक्षित आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. या घटनेला जबाबदार असलेल्यांविरोधात लवकरात लवकर खटला चालवावा. मग ते फास्ट ट्रॅक कोर्ट असो किंवा इतर माध्यमातून असो.
उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याकडे अनुभव आहे. काही वर्षापूर्वी दिल्लीमध्ये निर्भयाकांड झालं होतं. निर्भयाचे आरोपी पकडले. गुन्हे सिद्ध झाले. पण त्याच्या आरोपींना किती वर्षांनी फाशी दिली गेली? या दिरंगाईला जबाबदार कोण?, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
अशा घटनांचं राजकारण करता कामा नये. आम्ही आमच्या कार्यकाळात शक्ती विधेयक आणणार होतो. विधेयकाचा मसुदा तयार होता. मात्र कोरोनामुळे विधानसभेचे अधिवेशन केवळ दोन ते तीनच दिवस झाले. त्यानंतर आमचे सरकार पाडले व हे विधेयक रखडवले. हे विधेयक आणून बलात्काऱ्यांना या शक्ती विधेयकाची खरी शक्ती दाखवून देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी असं ऐकलं आहे की, मुलींवर अत्याचार झालेली बदलापूरची ती शाळा भाजपशी संबंधित कार्यकर्त्याची आहे. भाजपचा पदाधिकारी शाळेचा संचालक आहे. मी यात राजकारण आणत नाही. माझा तसा हेतूही नाही. मात्र कोणताही कार्यकर्ता असला अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी विनाविलंब त्याच्याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह देखील आता मुक्त आहे. कदाचित त्यालाही निबंध लिहायला सांगितला असावा. त्याचप्रमाणे आता यात भाजपाचे कार्यकर्ते असतील तर निबंध लिहून घेऊन त्यांना सोडून देणार आहात का? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्तीने इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण करणं त्यांना शोभत नाही. ही खूप संवेदनशील घटना आहे. अशा प्रसंगी उद्धव ठाकरेंसारख्या मोठ्या राजकीय नेत्यांनी राजकीय वक्तव्ये न करता,राजकारण न करता एखाद्या उत्तम राज्यकर्त्यांसारखं वागलं पाहिजे, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.
बदलापूरमध्ये राज्याला हादरवणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. दोन चिमुकल्यांसोबत शाळेतील कर्मचाऱ्याने दुष्कृत्य केले. ही घटना उजेडात आल्यानंतर याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या पालकांना १३ तास पोलीस स्टेशनला ताटकळत ठेवले गेले, हे सुद्धा संतापजनक आहे. घटना इतकी संवेदनशील असताना पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी १३ तास का लावले?कुठलाही मुलाहिजा न ठेवता या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी,अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.