मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ’ असं कुणाला म्हणाले उद्धव ठाकरे!

‘कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ’ असं कुणाला म्हणाले उद्धव ठाकरे!

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jun 22, 2022 07:55 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनात ‘कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ’ या म्हणीचा अर्थ उलगडून दाखवला. आज शिवसेनेतही हेच आज चाललं असल्याचं ते म्हणाले.

Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray on Eknath Shinde

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेना पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचे एकनाथ शिंदे जाहीरपणे सांगत असल्याने शिवसेनेचा एक मोठा गट त्यांच्यासोबत गेल्याचे स्पष्ट होत आहे. चालू राजकीय उलथापालथीमुळे मविआ सरकार भविष्यात राहणार की जाणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबूक लाइवच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केले. आपल्याच पक्षाच्या नेते शिवसेनेवर घाव घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.

उद्धव ठाकरे संबोधनात म्हणाले, ‘कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसने सांगितलं असतं की आम्हाला मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे नको आहेत, तर ते मी समजू शकलो असतो. परंतु काल कॉंग्रेस नेते कमलनाथ, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मला फोन करून सांगितलं की उद्धवजी आम्ही आपल्यासोबत आहोत. हा त्यांच्या भरवशाचा विषय आहे. परंतु माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको आहे याचं मला दुःख झालंय... धक्का बसला आहे.

शिवसेना आमदारांचा एक मोठा जत्था ‘नॉट रिचेबल’ होऊन परराज्यात जाऊन बसून तेथून खलबतं करत असल्याच्या घटनेवरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. ठाकरे म्हणाले, ‘सूरत किंवा आणखी कुठे जाऊन बोलायची गरज काय होती. सरळ समोर येऊन सांगायला हवं होतं की उद्धवजी तुम्ही कारभार करायला नालायक आहात. ठीकय… चला मी या पदावरून बाजुला होतो. आत्ता जरी त्यांच्यापैकी कुणी सांगितलं की आम्हाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी नकोय तर मी आत्तासुद्धा राजीनामा द्यायला तयार आहे.

उद्धव ठाकरेंनी सांगितली लाकूडतोड्याची गोष्टी

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ’ ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे. तीच परिस्थिती आज आहे. काही जणांना ही म्हण माहित आहे परंतु त्यामागची गोष्ट माहीत नाही. ती गोष्ट अशी आहे की एकदा एका जंगलामध्ये एक लाकूडतोड्या झाड तोडत होता. झाडावर कुऱ्हाडीचे घाव घालत होता. आपला आसरा असलेलं हे झाड तुटणार या भीतीने झाडावर राहणारे पक्षी कासावीस झाले. त्याहीपेक्षा कुऱ्हाडीच्या घावाने झाडाला किती वेदना होत असतील, असं पक्षी आपसांत बोलू लागले. झाड पक्षांना म्हणालं की घाव पडताएत म्हणून मला वेदना होत नाहीए. तर हा लाकूडतोड्या ज्या कुऱ्हाडीने माझ्यावर घाव घालतोय त्या कुऱ्हाडीचं लाकूड माझ्याच फांदीचं आहे. त्याच्या मला जास्त वेदना होत आहेत.’

लाकूडतोड्याची गोष्ट सांगितल्यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की शिवसेनेतही हेच आज चाललेलं आहे. शिवसेना ही जन्मदात्री आहे, तिच्यावर आपलाच दांडा बनून घाव घालण्याचं काम कुणी करू नये, असं भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी आपल्या संबोधनात केल.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या