Uddhav Thackeray Unhappy over Sharad Pawar : दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मंगळवारी आयोजित एका कार्यक्रमात शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला होता. या कार्यक्रमावरून आता राज्याच्या राजकारणात पडसाद उमटू लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर आज पत्रकार परिषद घेत टीका केली होती. त्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील शरद पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
दिल्लीत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात शरद पवार व एकनाथ शिंदे यांनी एकमेकांचे कौतुक देखील केले. मात्र, या कार्यक्रमावरून ठाकरे गटात अस्वस्थता पसरली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या सत्कार सोहळ्यावरुन नाराज झाला आहे. शिवसेना पक्ष फुटीस कारणीभूत एकनाथ शिंदे जबाबदार असल्याने शरद पवार यांनी या सत्कार कार्यक्रमाला जाणे टाळायला हवे होते, अशी भावना व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्या पूर्वी खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत शरद पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरेहे पक्षाच्या काही महत्वाच्या नेत्यांसोबत चर्चा करत असल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे आता महाविकास आघाडीचे काय होणार या बाबत देखील चर्चा सुरू झाल्या आहेत.
दिल्ली येथे झालेल्या सत्कार समारंभावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांनी पाहिल्यांना थेट शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर थेट नाराजी व्यक्त केली. संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं. त्यांनी बेईमानी केली म्हणून शिवसेनेत फुट पडली व महाविकास आघडीचं सरकार कोसळलं. त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी नव्हते जायला पाहिजे. ही आमची भावना असून यामुळे आम्ही महाराष्ट्रातील लोकांसमोर कोणत्या तोंडाने जाणार? असा सवाल राऊत यांनी केला.
राऊत म्हणाले, राजकारणात कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो. मात्र, ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली. त्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो. त्यांच्यासोबत खुलेआम बसणे व त्यांचा असा सन्मान करने ही योग्य गोष्ट नाही. हा सत्कार महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणाराय आहे. पवारांची भावना वेगळी असली तरी ते ज्येष्ठ नेते आहात. त्यांचा आम्ही आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शाहांच्या सहकार्याने तोडली व महाराष्ट्र कमजोर केला अशांना सन्मान केल्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्या. तुमचं दिल्लीतील राजकारण सर्वांना माहिती आहे. मात्र, आम्हाला देखील राजकारण कळतं. अशी टीका संजय राऊत केली.
राऊत म्हणाले, तुमचं व अजित पवार यांचं गुफ्तगू होत असेल, तो तुमचा कौटुंबिक प्रश्न आहे. अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला, कुटुंब फोडलं, याचं भान राखून आम्ही पावलं टाकतो, असे देखील राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी दिल्लीतील साहित्य संमेलनावर देखील टीका केली आहे. दिल्लीतील साहित्य संमेलन म्हणजे राजकीय दलाली आहे. कुणालाही कसेही पुरस्कार दिले जात आहे. त्यांचा साहित्याशी संबंध देखील नाही. माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीत दलाली करायला आला आहात का ? तुम्ही काय साहित्याची सेवा करत आहात? हे संमेलन म्हणजे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपद्व्याप आहे, आशा संमेलनात मी जाणार नाही असे राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या