शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खेडनंतर आज मालेगाव येथे सभा होत आहे. खेडमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केल्यानंतर प्रतिउत्तरादाखल एकनाथ शिंदे यांनीही खेडमध्ये सभा घेतली होती. त्यानंतर आता मालेगावात ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे. मात्र, तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी लावण्यात आलेल्या ऊर्दू भाषेतील बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत मालेगाव दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेला एक लाख लोकांची उपस्थिती असेल, असा दावा करण्यात आला आहे.
सभेपूर्वी बॅनरबाजी सामान्य गोष्ट आहे. मात्र, उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी ऊर्दू भाषेत लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या बॅनरची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. या सभेला जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहावे, यासाठी विशेष प्रयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुस्लिम बहुल भागांमध्ये अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांचे फोटो असलेले बॅनर लावले असून उर्दू भाषेतून या सभेचे निमंत्रण देण्यात आले आहे.
उर्दू भाषेतील पोस्टरचे संजय राऊत यांनी समर्थन केले असून, महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये उर्दूवर काही बंदी आहे का? अनेक लेखक, अनेक अभ्यासक साहित्यिक त्यांनी उर्दूमध्ये लिखाण केलेल आहे. आणि त्याच्यामुळे मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त या सभेला यावे, यासाठी ठाकरे गटाकडून हे प्रयोजन केल्याचं संजय राऊत यांनी म्हटले आहे. यातील काही बॅनरवर ‘मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगाव’, लिहिले असल्याचे सांगितले जात आहे.