मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : ‘देशातली लोकशाही संपलीय, आता सुप्रीम कोर्ट हीच आशा आहे, शेवटपर्यंत लढणार’

Uddhav Thackeray : ‘देशातली लोकशाही संपलीय, आता सुप्रीम कोर्ट हीच आशा आहे, शेवटपर्यंत लढणार’

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 10, 2024 08:21 PM IST

Uddhav Thackeray on Shiv Sena Verdict : शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर आलेल्या निकालावर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray on Shiv Sena Split Verdict : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय दिला. हा निर्णय देताना शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचाच असल्याचाही निर्वाळा दिला. या निकालाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. उद्धव ठाकरे यांनी या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. 'देशातील लोकशाही यांनी पायदळी तुडवलीच आहे. आता सर्वोच्च न्यायालय हीच शेवटची आशा आहे. तिथं आणि जनतेच्या दरबारात आम्ही शेवटपर्यंत लढत राहू, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. 'शिवसेनेच्या याचिकेवर निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं लवाद म्हणून बसवलेले नार्वेकर यांची वागणूक आम्ही पाहत होतो. न्यायमूर्तीच आरोपी जाऊन भेटल्यामुळं निकाल अपेक्षित होता. त्यांचं संगनमत झालंय हेच दर्शवणारी नार्वेकरांची वागणूक होती. लोकशाहीचा खून करण्यासाठी ह्याचं कटकारस्थान सुरू आहे का ही शंका मी उपस्थित केली होती. ती खरी ठरली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Sanajy Raut : बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचं गुजरात लॉबीचं षडयंत्र; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

नार्वेकरांनी स्वत:चा रस्ता मोकळा करून घेतला!

उद्धव ठाकरे यांनी यावेळी राहुल नार्वेकर यांच्या राजकीय प्रवासाची आठवण देत त्यांच्यावर बोचरी टीका केली. 'राहुल नार्वेकर यांनी निर्णय देताना लोकशाहीची हत्या केली आहे. नार्वेकर यांनी पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करणं अपेक्षित होतं, मात्र ते करण्याऐवजी पक्षांतरासाठी राजमार्ग आखून दिला. स्वत: त्यांनी अनेक पक्ष बदललेत त्यामुळं त्यांच्या भावी वाटचालीसाठी मार्ग मोकळा करून घेतल्याचं दिसतंय, असा टोला ठाकरे यांनी हाणला. 

मग आमच्या आमदारांना अपात्र का नाही केलं?

‘सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा एक मापदंड असतो. पण राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशही पायदळी तुडवले. आमच्या मागे महाशक्ती आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा जुमानत नाही हे आजच्या त्यांच्या निकालातून दिसून आलंय. मूळ प्रकरणच हे अपात्रतेचं होतं. त्यांनी अपात्र कुणालाच केलं नाही. आमची घटना त्यांनी ग्राह्य धरली नाही, जर आमची घटना ग्राह्य धरत नसाल तर आम्हाला अपात्र का नाही केलं,' असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. 

MLA Disqualification Verdict : ठाकरे गटाला मोठा धक्का; एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना, १६ आमदारही पात्र

शिवसेना कुणाची हे लहान मूलही सांगेल!

'देशातील लोकशाही यांनी पायदळी तुडवलीच आहे, आता सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व शिल्लक राहणार आहे की नाही हे आता न्यायालयानंच ठरवायचं आहे. आता न्यायालय हीच शेवटची आशा आहे. शिवसेना कुणाची हे महाराष्ट्रातील लहान मूलही सांगेल. त्यामुळं आम्ही शेवटपर्यंत लढू, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना कधीच संपणार नाही!

आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणारच आहोत. तिथं बराच वेळ लागू शकतो. आम्ही न्यायालयाला पुरेशी माहिती देऊच, पण हे सगळं न्यायालयाच्या समोरच होत आहे. त्यामुळं निवडणुकीच्या आधी दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ द्या एवढीच न्यायालयाला विनंती आहे. या लोकांना निवडणुका काढायच्या आहेत. फक्त वेळ काढायचा आहे. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करून शिवसेना संपवू असं त्यांना वाटत होतं. पण शिवसेना संपत नाही आणि संपणार नाही. मिंध्यांची शिवसेना जनता मानणारही नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उबाठा काय? मी उभा ठाकलेलो आहे!

एका पत्रकारानं उबाठा असा उल्लेख करताच उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 'उबाठा काय? माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्पष्ट आणि स्वच्छ आहे. मग इतरांच्या आई-वडिलांची नावंही अशीच घेणार का? आणि उबाठा म्हणत असाल तर मी उभा ठाकलेलो आहे. या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेलो आहे, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.

WhatsApp channel