Uddhav Thackeray : मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, राज्यात भांडत बसण्यापेक्षा…
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, राज्यात भांडत बसण्यापेक्षा…

Uddhav Thackeray : मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, राज्यात भांडत बसण्यापेक्षा…

Aug 09, 2024 11:48 AM IST

Uddhav Thackeray On Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबतच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, राजकीय नेत्यांच्या भूमिकेपेक्षा सरकारने सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवून त्यातून सर्वमान्य तोडगा काढावा.

मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Uddhav Thackeray On Maratha Reservation : राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी राज्यभरात पुन्हा दौरा सुरू केला आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांच्या एका गटाने महाविकास आघाडीतील पक्षांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करा, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. या गटाने आज रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री बाहेर ठिय्या आंदोलन करत उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाबद्दल भूमिका घ्यावी अशी मागणी केली.

दरम्यानमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी सरकारने काही दिवसांपूर्वीच सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. मात्र,विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यावरून टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान दिले होतं. त्यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर आपली मत व्यक्त केले आहे.

उद्धव ठाकरेंनी आज ‘मातोश्री’ वर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणाबाबतच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, राजकीय नेत्यांच्या भूमिकेपेक्षा सरकारने सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवून त्यातून सर्वमान्य तोडगा काढावा.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत मी काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये बोलताना भूमिका स्पष्ट केली होती. आरक्षणाबाबत आम्ही अनेकदा भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मांडण्यात आलेल्या विधेयकालाही आमचा पाठिंबा होता. आमचं म्हणणं इतकंच आहे, आरक्षणाच्याबाबतीत राजकीय नेत्यांच्या भूमिकेपेक्षा, सरकारने सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं आणि सर्वमान्य तोडगा काढावा. मध्यंतरी सरकारने आरक्षणाच्या बाबतीत सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचे नाटक करण्याचा प्रयत्नही केला होता, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी हाणला.

मराठा आंदोलकांच्या भेटीतही मी सांगितलं होतं की, दोन समाजाला लढवून एका पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण एकाच आईची मुलं आहोत,महाराष्ट्राची लेकरं आहोत. त्यामुळे सर्व समाजातील लोकांनी एकत्र या, त्यासाठी शिवसेनेचं काही सहकार्य लागत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यात भांडत बसण्यापेक्षा, मोदीकडे जा..

उद्धव ठाकरे म्हणाले, आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. यापूर्वी बिहार सरकारने आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र,न्यायालयाने ते रद्द केलं. कारण आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे अधिकार हे लोकसभेला आहेत. त्यामुळे सर्व समाजाच्या नेत्यांना पंतप्रधान मोदींकडे जावं लागेल. ते प्रश्न सोडवतील, कारण त्यांच्याकडे दैवी शक्ती आहे, असा टोलाही ठाकरेंनी लागावला.

एक स्पष्ट आहे की, आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकार सोडवू शकत नाही. त्यामुळे सर्वच समाजाला पंतप्रधान मोदींकडे हा प्रश्न मांडावा लागेल. मी सर्व समाजाच्या लोकांना विनंती करतो,की त्यांनी राज्यात आरक्षणासाठी भांडत बसण्यापेक्षा दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना यात लक्ष घालण्याची विनंती करावी.

Whats_app_banner

संबंधित बातम्या