मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबाबत उद्धव ठाकरेंना वेगळाच संशय; म्हणाले...

Uddhav Thackeray : अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबाबत उद्धव ठाकरेंना वेगळाच संशय; म्हणाले...

Feb 10, 2024 03:10 PM IST

Uddhav Thackeray on Abhishek Ghosalkar Murder : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबद्दल उद्धव ठाकरे यांनी संशय व्यक्त केला आहे.

Uddhav Thackeray on Abhishek Ghosalkar murder
Uddhav Thackeray on Abhishek Ghosalkar murder

Uddhav Thackeray on Abhishek Ghosalkar Murder : ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं असतानाच शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मोठं विधान केलं. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचं प्रकरण संशयास्पद आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मातोश्री निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणारा एक गुंड होता. त्या गुंडानं नंतर आत्महत्या केली. हे प्रकरण वरकरणी वाटतं तितकं सोपं दिसत नाही. सुडाची भावना असते. त्यातून एखादा माणूस टोकाचं पाऊल उचलतो. पण त्या गुंडानं स्वत: आत्महत्या का केली, हा प्रश्न उरतो,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ट्रेंडिंग न्यूज

‘अभिषेक आणि त्या मॉरिसच्या फेसबुक लाइव्हचा व्हिडिओ आलाय. पण अभिषेकवर नेमकं गोळ्या कोण झाडतंय हे कळायला मार्ग नाही. मॉरिसकडं परवानाधारक शस्त्र नव्हतं. पण त्यानं मिश्रा नावाचा कोणी बॉडीगार्ड ठेवला होता. मुळात त्याला बॉडीगार्ड ठेवण्याची वेळ का आली हाही प्रश्न आहे. त्या बॉडीगार्डच्या शस्त्रातून मॉरिसनं गोळ्या चालवल्या असं म्हटलं जातंय. आता त्या गोळ्या खरंच मॉरिसनं चालवल्या की आणखी कोणी चालवल्या? की अभिषेक आणि मॉरिस या दोघांनाही मारण्याची सुपारी तिसऱ्या कुणी दिली होती का हा एक मोठा प्रश्न आहे,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘पूर्वीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या गुंडाचा सत्कार केला होता. आता राज्यपालच गुंडांचा सत्कार करत असतील तर दाद कुणाकडं मागायची,’ असा सवाल ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांच्या गुन्ह्यांचा पाढाच वाचला!

'गेल्या वर्षी गणपतीच्या मिरवणुकीत एका आमदारानं गोळीबार केला होता. त्याच्यावर कारवाई झाली नाही. दहिसरच्या जवळच्याच एका आमदाराच्या मुलानं बिल्डरच्या मुलाचं अपहरण केलं होतं. त्याच्यावर कारवाई नाही. ठाण्यात एका तरुणीवर हल्ला झाला होता, तो भाजपचा कार्यकर्ता होता, त्याच्यावर कारवाई झाली नाही. काल पुण्यात निखिल वागळे, विश्वंबर चौधरी व असीम सरोदे यांच्यावर हल्ला झाला. तो काही अचानक झाला नव्हता. भाजपच्या गुंडांनी धमकी दिली होती. पोलिसांनी काही कारवाई केली नाही, याची आठवणही उद्धव यांनी दिली.

महाराष्ट्र सरकार बरखास्त करा!

‘आम्हाला राज्यपालांकडून कोणतीही अपेक्षा नाही. मुळात राज्यपाल हे पद ठेवावं की नाही हाच प्रश्न आहे. त्यामुळं आम्ही सरकारच्या बरखास्तीची मागणी मीडियाच्या माध्यमातून करतोय. महाराष्ट्रात जे चाललंय, ते भयंकर आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची गरज आहे,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात विषाणू फोफावतोय!

‘करोनाच्या काळात एका विषाणूचा सामना आपण सर्वांनी केला. पण हा वेगळा विषाणू सध्या देशात फोफावतोय. करोनावर मास्क हा उपाय होता, तसा या विषाणूवर मत न देणं हा उपाय आहे. पुढच्या पिढ्यांचं भवितव्य गुंडांच्या हाती द्यायचं नसेल तर जनतेनं हा उपाय करावा,’ असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

WhatsApp channel