Uddhav Thackeray Town Hall Live updates : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या संदर्भात दिलेला निकाल कसा पक्षपाती आणि चुकीचा आहे हे सांगण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं आज पत्रकारांची महापरिषद घेतली. सर्व कायदेशीर बाजू जनतेच्या न्यायालयात मांडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे व राहुल नार्वेकर यांच्यावर घणाघात केला. ‘हिंमत असेल तर शिंदे आणि नार्वेकर यांनी जनतेमध्ये येऊन शिवसेना कुणाची हे सांगावं,’ असं जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.
> १९९९ नंतर आमच्या पक्षात काहीच झालं नव्हतं, तर निवडणूक आयोगानं आम्हाला कधी कारणे दाखवा नोटीस का दिली नाही? १९९९ नंतर आम्ही अनेक निवडणुका लढल्या. अनेक पक्षांना पाठिंबा दिला. त्या सगळ्यांना मान्यता मिळाली. तरी देखील आम्हाला कुणी काही विचारणा केली नाही - उद्धव ठाकरे
> निकाल येण्याआधी निवडणुकीला मी तयार आहे. मी माझी मशाल घेऊन येतो. चोरांनी माझं चोरलेलं धनुष्य घेऊन यावं. माझ्यात जी हिंमत आहे, ती त्यांच्यात नाही - उद्धव ठाकरे
> शिवसेनेच्या संदर्भातील खटल्याची सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर हे देखील प्रचंड दबावाखाली होते. आम्हाला त्यांची बॉडी लँग्वेज कळत होती. त्यामुळं निवडणूक आयोग हा देखील कटात सहभागी होता हे दिसून येतं - असीम सरोदे
> उद्धव ठाकरे हे आम्हाला घरगड्यासारखे राबवतात असं सांगतात. पंचतारांकित शेती असलेला हा कुठला घरगडी आहे? - उद्धव ठाकरे
> देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षे मुख्यमंत्रीपद उबवलं, ते कोणाच्या पाठिंब्यावर? मिंध्या आणि बाकीच्यांना एबी फॉर्म कुणी दिले होते? - उद्धव ठाकरे
> शिवसेनेची १९९९ ची घटनाच तुम्हाला मान्य होती. मग २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीच्या आधी मोदींना पाठिंबा देण्यासाठी मला कशाला बोलावलं होतं? कशासाठी माझी सही घेतली होती? एखाद्या ढोकळेवाल्याची सही घ्यायची होती ना? - उद्धव ठाकरे
> ज्या महाराष्ट्रात घटना लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, त्याच महाराष्ट्रात लोकशाहीचा खून करण्याची सुरुवात झाली. इथं लोकशाहीचे मारेकरी जन्माला आलेत, पण महाराष्ट्राची माती या गद्दारांना थारा देणार नाही - उद्धव ठाकरे
> संपूर्ण देशातील प्रादेशिक पक्ष संपवायचा त्यांचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोगाला हे मान्य आहे का? हे सगळं घातक प्रयत्न सुरू आहेत - उद्धव ठाकरे
> ही केवळ उद्धव ठाकरेंची किंवा शिवसेनेची नाही. देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही? सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात राहणार की नाही याचा निर्णय आता होणार आहे - उद्धव ठाकरे
> निवडणूक आयोगावरच एक खटला दाखल करायला पाहिजे. निवडणूक आयोगानं आम्हाला कामाला लावलं होतं. १९ लाख ४१ हजार प्रतिज्ञापत्रं आम्ही त्यांना दिली होती. त्याच्या गाद्या करून झोपले का आयोगवाले? शिवसैनिकांनी स्वत:च्या पैशानं ही प्रतिज्ञापत्रं बनवून घेतली होती. तुमच्यासारखे आमचे दोन नंबरवाले मित्र नाहीत. निवडणूक आयोगाचा हा मोठा भ्रष्टाचार आहे - उद्धव ठाकरे
> मिंधे गटानं पुन्हा कोर्टात धाव घेतली आहे. म्हणजे या अध्यक्षावर त्यांचाही विश्वास नाही. मग त्यांनी अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणावा. आम्ही त्यांना पाठिंबा देतो - उद्धव ठाकरे
> शिंदे आणि राहुल नार्वेकर यांनी माझ्यासोबत जनतेसमोर येऊन उभं राहावं आणि तिथं सांगावं, शिवसेना कुणाची? मग कुणाला पुरावा, गाडावा किंवा तुडवावा हे जनताच ठरवेल - उद्धव ठाकरे
> उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेला संबोधित करत आहेत
> सर्वोच्च न्यायालयातील वकील अॅड. राहुल शर्मा हे पत्रकार परिषदेला संबोधित करत आहेत
> नेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे पाय धरल्याचा व्हिडिओ पत्रकार परिषदेत सादर
> २०१८ साली झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचं व्हिडिओ चित्रणही यावेळी दाखवण्यात आलं.
> शिवसेनेच्या या ठरावांची प्रत मी ०३ मार्च २०१३ रोजी निवडणूक आयोगाला दिली होती. त्याची पोचपावती देखील आमच्याकडं आहे. मात्र ही प्रत आमच्याकडं नाही असं सांगून नार्वेकर यांनी निकाल दिला आहे - अनिल परब
> बाळासाहेबांना जे अधिकार होते, ते सर्व अधिकार पक्षप्रमुख उद्ध ठाकरे यांना देण्यात आले होते - अनिल परब
> सध्या शिंदे गटात असलेले रामदास कदम यांनी पक्ष प्रमुख पद निर्माण करण्याचा ठराव मांडला होता. तसंच, आता शिंदेंसोबत असलेले गजानन कीर्तिकर यांनीच या ठरावाला अनुमोदन दिलं होतं. हा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला होता.
> २३ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या पक्षाच्या संघटनात्मक पुनर्रचनेच्या ठरावाचा व्हिडिओ दाखवण्यात आला.
> शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मांडली भूमिका
> दोन मित्र भेटले. एक म्हणाला, माझ्या बकरीनं अंडं दिलंय. दुसरा म्हणाला बकरी कधी अंडं देते का? पहिला मित्र दुसऱ्याला घेऊन घरी गेला आणि अंडं दाखवलं. त्यानं कोंबडीचंच नाव बकरी ठेवलं होतं. राहुल नार्वेकरांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलंय - असीम सरोदे
> ज्यांचं डोकं ठिकाणावर आहे, त्यांच्यासाठी शिवसेनेच्या संदर्भातील निकाल हा मानसिक त्रासाचा मुद्दा आहे - असीम सरोदे
> शिवसेनेच्या संदर्भातील निकाल हा फक्त उद्धव ठाकरे यांच्या पुरता मर्यादित नाही. हा लोकशाहीच्या समोरचा प्रश्न आहे - असीम सरोदे
> राहुल नार्वेकर यांना पुढं करून, त्यांच्या मदतीनं राजकारण करणारे सर्व लोक लोकशाहीद्रोही आहेत - असीम सरोदे
> भरत गोगावले यांची प्रतोदपदी झालेली नियुक्ती ही बेकायदा आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. कारण, फुटून आलेल्या गटाला प्रतोद नियुक्तीचा अधिकार नसतो. तो अधिकार राजकीय पक्षाला असतो - असीम सरोदे
> मूळ पक्ष ही विधिमंडळ पक्षाची जननी असते. विधिमंडळ पक्षाचं आयुष्य फक्त ५ वर्षांचं असतं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले या पाच वर्षांचं आयुष्य असलेल्या गटाचे सदस्य आहेत - असीम सरोदे
> घटनेतील दहावं परिशिष्ट हे पक्षांतर बंदी कायद्याबाबत आहे. पक्षांतर सोप्या पद्धतीनं कसं करायचं याला चालना देणारं हे परिशिष्ट नाही - असीम सरोदे
> न्यायालय ही व्यवस्था दबावाखाली आहे हे आजचं वास्तव आहे - असीम सरोदे
> कुठल्याही न्यायालयाच्या निकालाचं विश्लेषण करण्याचा देशातील जनतेला अधिकार असतो. त्यामुळं न्यायालयाचा अवमान होत नाही - असीम सरोदे
> आजच्या जनता न्यायालयात वेगवेगळ्या बाजू नाहीत. केवळ सत्याची बाजू आहे. ही बाजू मांडताना आपल्या सर्वांच्या मनात स्पष्टता असली पाहिजे - असीम सरोदे
> अॅड. असीम सरोदे देतायत न्यायालयीन खटल्याची माहिती
> आम्ही इमानदारीनं लढलो आणि मिंधे व त्यांचे पाठीराखे बेईमानीनं जिंकले - संजय राऊत
> राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल त्यांची बायकोही मान्य करणार नाही - संजय राऊत
> बाळासाहेबांची शिवसेना नार्वेकर यांनी ज्या पद्धतीनं चोर आणि लफंग्यांच्या हातात दिली. त्यामुळं महाराष्ट्र खदखदतोय - संजय राऊत
> शिवसेनेच्या बाबतीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालासंदर्भात हे न्यायालयीन कामकाज होत आहे. महाराष्ट्राची जनता आज न्यायमूर्तीच्या भूमिकेत आहे - संजय राऊत
> अभिनव जनता न्यायालयाला आज सुरुवात होतेय. आजच्या दिवसाची नोंद इतिहासाता होईल - संजय राऊत
> अॅड. रोहित शर्मा आणि अॅड. असीम सरोदे हे देखील पत्रकार परिषदेला उपस्थित
> घोषणांच्या गजरात उद्धव ठाकरे यांचं शिवसैनिकांकडून स्वागत
> उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचले
> दुपारी साडेतीन वाजता होणारी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद अद्यापही सुरू नाही.
> थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात, उत्सुकता शिगेला
> उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होण्याआधीच सत्ताधारी सतर्क. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ५ वाजता विधान भवनात बोलावली पत्रकार परिषद
> उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला कायदेतज्ज्ञ, विविध पक्षांतील मान्यवर, राजकीय विश्लेषक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, शिवसैनिक व सर्वसामान्य जनता उपस्थित राहणार आहे.
> उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेकडं देशाचं लक्ष. पत्रकार परिषदेची सर्व तयारी पूर्ण
> शिवसेनेची २०१३ ची घटना नाकारणारे सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे त्यावेळी शिवसेनेतच होते. उद्धव ठाकरे यांच्या निवडीच्या वेळी ते स्वत: तिथं हजर होते याचेही पुरावे दिले जाणार
> उद्धव ठाकरे यांची पक्षाच्या प्रमुखपदी २०१३ साली झालेल्या निवडीचे दाखले आणि पुरावे पत्रकार परिषदेत दिले जाणार आहेत.
> विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या संदर्भात दिलेला निकाल कसा चुकीचा आहे याची पोलखोल उद्धव ठाकरे करणार
> मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम सभागृहात दुपारी साडेतीन वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.
> माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद.