राजकारणातील कटुता वाढत असताना संस्कृती जपणारा नेता गेला, उद्धव ठाकरेंची गिरीश बापटांना श्रद्धांजली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राजकारणातील कटुता वाढत असताना संस्कृती जपणारा नेता गेला, उद्धव ठाकरेंची गिरीश बापटांना श्रद्धांजली

राजकारणातील कटुता वाढत असताना संस्कृती जपणारा नेता गेला, उद्धव ठाकरेंची गिरीश बापटांना श्रद्धांजली

Mar 29, 2023 07:27 PM IST

UddhavThackeray girishbapat : गिरीश बापट यांच्यानिधनाने महाराष्ट्राने एक व्यापक जनसंपर्क असलेला नेता आणि उत्कृष्ट संसदपटू गमावल्याच्या भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

उद्धव ठाकरेंची गिरीश बापटांना श्रद्धांजली
उद्धव ठाकरेंची गिरीश बापटांना श्रद्धांजली

पुण्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. बापट यांना पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे, शरद पवार यांच्यासह देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. गिरीश बापट यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक व्यापक जनसंपर्क असलेला नेता आणि उत्कृष्ट संसदपटू गमावल्याच्या भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक व्यापक जनसंपर्क असलेला नेता आणि उत्कृष्ट संसदपटू गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना, असे ट्विट उद्धव ठाकरे यांनी करत गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गिरीश बापट गेले. राजकारणातल्या जुन्या वळणाचा उत्तम माणूस म्हणुन त्यांची ओळख होती. शिवसेना भाजपा युती असताना ज्यांनी सतत युती टिकावी यासाठी मनापासून प्रयत्न केले असे बापट होते. सगळ्यांना एकत्र ठेवणारा दिलदार नेता अशी त्यांची किर्ती होती.

गिरीश बापट आणि पुणे असे एक समीकरण बनले होते.. शिवसेनेशी त्यांचा विशेष स्नेह होता.. अनेकदा खुले पणाने ते मातोश्रीवर येत जात होते. महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता वाढत असताना संस्कृती जपणारा गिरीश बापट यांच्या सारखा नेता आपल्याला सोडून गेला.आई जगदंबा त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.. अशी श्रद्धांजली उद्धव यांनी वाहिली आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर