Uddhav Thackeray On ED Raids In BMC Mumbai : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप व शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. मुंबई महापालिकेतील व्यवहारांची चौकशी केली जातेय, चौकशी करायचीच असेल तर ठाणे मनपाचीही करा, ही मागणी भाजपच्याच आमदाराने केली आहे. परंतु ज्या सरकारचा जन्मच खोक्यातून झालेला आहे, ते काय चौकशा करणार?, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबईतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, फक्त मुंबई महापालिकेचीच नाही तर ठाणे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील व्यवहारांचीही चौकशी व्हायला हवी. इतकंच काय तर पीएम केयर फंडाची उच्चस्तरीय चौकशी का होत नाही?, मिळेल तिथं भ्रष्टाचार करा, लोकांना लुटा ही आमची परंपरा नाही. त्यामुळं शिंदे-फडणवीस सरकारने केवळ बीएमसीची चौकशी न करता त्यांची सत्ता असलेल्या महानगरपालिकांमधील व्यवहारांचीही चौकशी करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हातोडा चालवला आहे. यापुढे बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा चालवल्यास तो हात शाबूत ठेवला जाणार नसल्याचं सांगत ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. तसेच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी झाकीर नाईक याच्याकडून पैसे घेतले, हिंमत असेल तर शिंदे-फडणवीसांनी विखे पाटलांची चौकशी करावी, असंही आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलं आहे.
सत्ताधारी पक्षातील लोक सातत्याने माझ्या कुटुंबियावर वैयक्तिक हल्ले करत आहे. परंतु त्यांनी लक्षात ठेवावं की कुटुंब त्यांनाही आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबियांच्याही व्हॉट्सअॅप चॅट्स बाहेर येत आहे. आम्ही अद्यापही त्यावर बोललेलो नाही. त्यांच्या कुटुंबियांवर आम्ही बोलायला लागलो तर त्यांना शवासन करावं लागेल. कारण त्यांना वेगळी कोणतीच आसनं झेपणार नाही, फक्त पडून रहावं लागेल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.
संबंधित बातम्या