मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  चोराला चोर म्हणणं हा गुन्हा झालाय; राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानं उद्धव ठाकरे संतापले!

चोराला चोर म्हणणं हा गुन्हा झालाय; राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानं उद्धव ठाकरे संतापले!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 24, 2023 05:26 PM IST

Uddhav Thackeray on Rahul Gandhi Disqualification : एका भाषणापायी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या लोकसभेच्या निर्णयाचा उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

Uddhav Thackeray - Rahul Gandhi
Uddhav Thackeray - Rahul Gandhi

Uddhav Thackeray on Rahul Gandhi Disqualification : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभेनं रद्द केल्याच्या निर्णयावर देशातील राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. भाजपविरोधी पक्षांनी केंद्र सरकारला अक्षरश: घेरलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संतप्त शब्दांत या निर्णयाचा निषेध केला आहे. चोराला चोर म्हणणं हा देखील आता आपल्या देशात गुन्हा ठरला आहे, असा मार्मिक टोला त्यांनी मोदी सरकारला हाणला आहे.

'राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणं हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

‘राहुल गांधी यांच्या बाबतीतला निर्णय हे लोकशाहीचं सरळ-सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल,’ असंही उद्धव ठाकरे यांनी पुढं म्हटलं आहे.

विधानसभेत विरोधी पक्षांचा सभात्याग

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याच्या निर्णयाचा महाविकास आघाडीनं तीव्र निषेध केला आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याची बातमी आली. ही बातमी समजताच विरोधी पक्षांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला व लोकसभेच्या निर्णयाचा निषेध करत सभात्याग केला.

WhatsApp channel