अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी होणार आहे. या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी अयोध्येत सुरू झाली आहे. आज मोदींकडून अयोध्येत अनेक विकासकामांचे लोकार्पण केले. मात्र राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणावरूनही राजकीय वादंग निर्माण झाले आहे. राम मंदिराच्या निमंत्रणाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्हाला अद्याप निमंत्रण मिळालेलं नाही. मात्र आम्ही कधीही जाऊन दर्शन घेऊ शकतो. यापूर्वी मुख्यमंत्री असताना मी अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे, त्यामुळे आयोध्येत जाऊन कधीही दर्शन घेईन.
अयोध्येमध्ये राममंदिर होणं ही आनंदाची गोष्ट आहे. कारण त्याच्यासाठी शिवसेनेनं खूप मोठा संघर्ष केला आहे. शिवसेनाप्रमुखांनी राममंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून त्यांचा मतदानाचा अधिकार हिसकावून घेण्यात आला होता. राममंदिरासाठी अनेक शिवसैनिक-कारसेवकांनी रक्त साडंलेलं आहे.
राम मंदिर आंदोलनावरून भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसैनिकांवर केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचं शिवसैनिकांचं योगदान नाकारलं जात आहे. शिवसेना प्रमुखांबद्दल, शिवसेनेच्या योगदानाबद्दल असं बोलणाऱ्यांची मानसिकता लोकांना समजत आहे. फडणवीसांनी त्यांच्या ढोंगीपणाचा बुरखा स्वतःहून उतरवला आहे. बाबरी शिवसैनिकांनी पाडली नाही, तर मग त्यांच्या वजनानं बाबरी कोसळली असेल तर माहीत नाही. त्यांचे नेते सुंदरलाल भंडारी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी दिलेल्या विविध मुलाखतींमधील प्रतिक्रिया फडणवीसांनी पाहावी. याबाबत त्यांचा गृहपाठ कमी पडतोय.
ज्याच्या मनात राम आहे, त्यांना निमंत्रणाची गरज नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्यालाही उद्धव ठाकरेंनीउत्तर दिलं आहे. मनात राम असेल तर ते फडणवीसांनी सांगण्याची गरज काय? राम मंदिर नसतानाही लाखो भाविक आयोध्येत जातच होते. यात राजकारणाचा भाग नाही, त्यामुळे त्यांनी फुशारक्या मारु नयेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला.
बाबरी पाडली तेव्हा भाजपचीच मंडळी तिथे होती. बाकी शिवसेनेचे कोणीच नव्हते असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठवाडा दौऱ्यावर असताना त्यांनी बाबरी पाडतानाच्या आठवणी सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका केली. मंदीर वही बनायेंगे लेकीन तारीख नही बतायेंगे असं आम्हाला हिणवलं जायचं. पण मोदींच्या नेतृत्वात आम्ही हे करुन दाखवलं, असेही ते म्हणाले.
महाआघाडीतील जागावाटपाबाबत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जागावाटपाबाबत आमची बैठक होईल. त्यानंतर हे सुरळीत होईल. वंचितसोबत आमची बोलणी सुरु आहेत. मविआ आणि वंचित अशी संयुक्त बैठक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाआघाडीत बिघाडी होणार नाही. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी जोपर्यंत आम्ही बोलत नाही, तोपर्यंत आमच्यापैकी कुणीही यावर काही बोलणार नाही, अशी माहिती ठाकरेंनी दिली.