मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Budget Session : उद्धव-फडणवीसांच्या खेळीमेळीमुळं नव्या राजकीय खेळीच्या चर्चांना उधाण

Budget Session : उद्धव-फडणवीसांच्या खेळीमेळीमुळं नव्या राजकीय खेळीच्या चर्चांना उधाण

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 23, 2023 06:10 PM IST

Maharashtra Budget Session : सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली आहे.

Uddhav Thackeray And Devendra Fadnavis
Uddhav Thackeray And Devendra Fadnavis (HT)

Uddhav Thackeray And Devendra Fadnavis : शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राजकीय संघर्ष पेटलेला आहे. याशिवाय बंडाला भाजपची साथ असल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून सातत्यानं भाजपवर टीका करण्यात आली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकदा तुफान हल्लाबोल केला होता. परंतु आता विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत. यावेळी दोघांनी एकमेकांना पाहिल्यानंतर स्मितहास्य केलं. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून दोघांनी एकमेकांशी गप्पा मारल्या. त्यामुळं आता ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपचा विधानसभेच्या एक आणि विधानपरिषदेच्या दोन जागांवर पराभव झाला आहे. त्यामुळं भाजपच्या नेत्यांनी शिंदे गटाशी असलेल्या युतीचं मूल्यमापन करण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. याशिवाय भाजपाचे अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडे आग्रह धरत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळं आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळं ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय युती होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत थेट उद्धव ठाकरेंना भाजपशी युती करण्याचं निमंत्रण दिलं. शिवाय फडणवीसांनी आदित्य ठाकरेंची कौतुक करत ठाकरेंशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळं आता शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे.

फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ठाकरे काय म्हणाले?

विधीमंडळाच्या आवारात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, यापूर्वी राजकारणात खुलेपणा होता. परंतु हल्ली बंद दाराआड झालेली चर्चा फलदायी ठरते, असं बोललं जातं. त्यामुळं फडणवीसांशी बंद दाराआड चर्चा झाली तर त्यावेळी मी नक्कीच बोलेल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. यावेळची आमची भेट ही शिष्टाचारानुसार होती असंही ठाकरेंनी स्पष्ट केलं.

WhatsApp channel