Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या राज्यातील दोन प्रमुख राजकीय आघाड्यांचं जागावाटपाचं सूत्र अद्यापही ठरलेलं नाही. महायुती प्रमाणेच महाविकास आघाडीमध्येही प्रचंड रस्सीखेच आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला १०० पेक्षा जास्त जागा देण्याची काँग्रेसची तयारी नसल्याचं समजतं. तसं झाल्यास ३० वर्षांत पहिल्यांदाच शिवसेनेला कमी जागांवर लढावं लागणार आहे.
२०१९ साली काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आलेली शिवसेना त्यावेळी अखंड होती आणि साहजिकच आघाडीत मोठ्या भावाच्या भूमिकेत होती. मात्र पक्षात फूट पडल्यानंतर आणि लोकसभेत काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्यानंतर आघाडीत शिवसेनेचं वजन कमी झालं आहे. त्याचा फायदा घेत काँग्रेसनं शिवसेनेला जास्त जागा देण्यास विरोध दर्शवला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं १२५ जागांवर दावा केला आहे, तर काँग्रेसनं ९५ जागा देण्याची तयारी दाखवली आहे. काँग्रेस सर्वाधिक जागा लढवण्यावर ठाम आहे.
या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार शाब्दिक फैरीही झडल्या आहेत. नव्या माहितीनुसार, शिवसेनेला दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागणार आहे. तसं झाल्यास शिवसेनेच्या निवडणुकीच्या इतिहासातील हा नीचांक ठरेल. शिवसेनेनं यापू्र्वी १०० पेक्षा कमी जागा कधीही लढवल्या नाहीत.
ठाकरेंच्या शिवसेनेला १०० पेक्षा कमी जागा मिळाल्यास भाजपकडून तो प्रचाराचा मुद्दा बनवला जाऊ शकतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड केल्याचा आरोप भाजपनं उद्धव ठाकरे यांच्यावर याआधीच केला आहे. आता कमी जागांवर लढावं लागल्यास भाजपला आयतीच संधी मिळणार आहे. शिवसेनेला १०० पेक्षा कमी जागा मिळाल्या तर १९९५ नंतरचा हा सर्वात कमी आकडा असेल.
आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेनं १६० पेक्षा जास्त जागा लढवल्या आहेत. २०१९ मध्ये भाजपशी वाटाघाटी करून त्यांनी १२४ जागा लढल्या होत्या. आता तो आकडाही गाठणं कठीण जाणार आहे.
१९९५ मध्ये शिवसेनेनं १६९ जागा लढवल्या आणि ७३ जिंकल्या.
१९९९ मध्ये १६१ जागांवर लढून त्यांना ६९ जागा जिंकल्या होत्या.
२००४ मध्ये शिवसेनेनं १६३ जागांपैकी ६२ जागा जिंकल्या.
२००९ मध्ये १६० जागा लढवल्या होत्या आणि ४५ जिंकल्या होत्या.
२०१४ मध्ये २८६ जागांवर लढून ६३ जागा मिळवल्या.
२०१९ मध्ये शिवसेनेनं १२४ जागांवर निवडणूक लढवली होती आणि ५६ जागांवर आमदार निवडून आले होते.
संबंधित बातम्या