राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्याची घोषणा अजित पवारांनी केली. ही घोषणा आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या घोषणा झाल्याचे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.
महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे यांचे कंत्राटदार मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. अर्थसंकल्पानंतर उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळाच्या बाहेर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आजचा अंतरिम अर्थसंकल्प मांडाला आहे. राज्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आता आता अर्थसंकल्पातील घोषणांचा फटका बसतो की काय अशी अवस्था आहे. अर्थसंकल्पात नवनव्या घोषणा केल्या आहेत. नवीन रस्त्याच्या घोषणा केल्या असून पहिल्या घोषणाचे काय? मराठी भाषा भवनांचा आम्ही उल्लेख केला तोच आहे. पुढच पाठ मागच सपाट, अशी सरकारची अवस्था आहे.
जरांगे पाटील यांच्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही जरांगे यांच्या मागण्या विचारात न घेता त्यांना अतिरेकी ठरवण्याच्या मागे लागला आहात. आंदोलकांवर लाठीहल्ला झाला. महिलांना मारहाण झाली, त्यांची डोकी फोडली होती. आमच्याकडून कोणी त्यांना किती फोन केले? हे आताच्या महासंचालकांनी फडणवीसांना सांगावे.
राज्यातून रोजगार हिरावले जात असून बेरोजगारी दूर करण्याबाबत या अर्थसंकल्पातून काहीच ठोस अशी तरतूद नाही. रोजगार हिरावला जात आहे. देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात. मात्र राज्यकर्ते इतके विचित्र आहेत की, हे नथुराम गोडसेचे स्मारक देखील उभे करतील. राज्याचे प्रमूख ठाण्याचे मात्र राज्य नागपूर वरून चालते. असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला.
अंतरिम बजेट सादर करताना निर्मला सीतारामन यांनी काही मर्यादा पाळल्या आणि अंतरिम बजेटमध्ये आहे त्याच गोष्टी कायम ठेवल्या. मात्र राज्यातील अर्थमंत्र्यांनी घोषणाबाजी करण्यात त्यांनाही मागे पाडले. ९ हजार कोटींच्या तुटीचे बजेट सरकारने मांडले आहे. केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घोषणा करण्यात आल्या आहेत, अशी टीका जयंत पाटील म्हणाले.