उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घराणेशाहीवरून महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आमच्या हातात ईडी-सीबीआय येईल तेव्हा भाजप देशातून हद्दपार झालेला असेल. भारतीय जनता पक्ष संपून जाईल. लोहा लोहे को काटता है, हे त्यांनाच माहिती आहे असे नाही, हे आम्हालाही माहिती आहे. ज्या दिवशी आमच्या हातात सत्ता येईल व ईडी-सीबीआयसारख्या तपास संस्था आमच्या नियंत्रणात येतील, तेव्हा फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा, असे थेट आव्हान संजय राऊतांनी दिले.
भाजप हा दुसऱ्यांची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष आहे. त्यांना स्वतःची पोरं नाहीत. दुसऱ्यांची पोरं कडेवर घेऊन फिरत आहेत. स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हलवू नका ते पुन्हा पळून जातील, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.
संजय राऊत म्हणाले रविवारी इंडिया आघाडीची शिवतीर्थावर मोठी जनसभा पार पडली. इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहिले. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकरही सभेला उपस्थित होते. सर्व नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही मोठ्या शक्तीबरोबर लढत आहोत. राहुल गांधी देशातील लोकप्रिय नेते आहेत. देश भावी पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहत आहे. राहुल गांधी महाशक्तीसमोर झुकत नाहीत, त्यांचा हा बाणा देशातील लोकांना आवडत आहे. हुकुमशाहीपुढे न झुकणारे ते नेते आहेत. जे शरण गेले, पळून गेले त्यांना इतिहास माफ करणार नाही, आम्ही लढत राहू.
दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील भव्य सभेने झाली. इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित होते. यावेळी राहुल गांधींनी मोदींवर टीका करताना म्हटले की, ते ईव्हीएमशिवाय जिंकूनच शकत नाहीत.