विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. त्यातच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) मोठा धक्का बसला आहे. उमेदवारी जाहीर केलेल्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली असून लढण्याआधीच तलवार म्यान केली आहे. हा उमेदवार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
उद्धव ठाकरे गटाने औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी दिली होती. त्यांना एबी फॉर्मही दिले होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवस बाकी असतानाच किशनचंद तनवाणी यांनी निवडणूक न लढण्याचे जाहीर केले. त्यांनी पक्षाचा एबी फ़ॉर्म परत केला आहे. तनवाणी यांच्या अचानक माघारीने उद्धव सेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या मतदारसंघासाठी उद्धवसेनेने बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन थोरात यांची उमेदवारी जाहीर केली. तसेच ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतलेल्या किशनचंद तनवाणी यांना पक्षाच्या सर्व पदातून मुक्त करत असल्याचे यावेळी दानवे यांनी जाहीर केले.
उमेदवारी नाकारण्याचं कारण काय?
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेकडून प्रदीप जैस्वाल निवडणूक लढवत आहेत. तर किशनचंद तनवाणी यांना ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर झाली होती. जैस्वाल व तनवाणी दोघेही कट्टर शिवसैनिक आणि बालपणापासूनचे मित्र आहेत. दोन मित्रांमधील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही दोघे एकमेकांच्या विरोधात लढले होते. यावेळी दोघांमध्ये मत विभागणी होऊन एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते.
त्यानंतर सन २०१९ मध्ये जैस्वाल यांनी तनवाणी यांना शब्द दिला होता की, २०२४ च्या निवडणुकीत पाठिंबा देतील. मात्र, आता ते पाठिंबा देण्यास तयार नसल्याचे तनवाणी यांनी सांगितले. तसेच आताची परिस्थिती २०१४ सारखीच असून मतविभाजनाचा फायदा एमआयएमला होऊ शकतो, यामुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा तनवाणी यांनी केली. मात्र यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
२०१९ च्या निवडणुकीत प्रदीप जैस्वाल हे निवडणुकीच्या मैदानात होते. तर किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली होती. त्यामुळे प्रदीप जयस्वाल यांनी ही निवडून जिंकली होती. त्यावेळी त्यांनी तनवाणी यांना २०२४ मध्ये पाठिंबा देण्याचे व आपण न लढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता त्यांनी शब्द फिरवला आहे.
संबंधित बातम्या