धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून धगधगती मशाल देण्यात आली आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या पक्षाचं नाव असणार आहे. तर शिंदे गटाला नव्याने तीन चिन्ह देण्यास निवडणूक आयोगाकडून सांगितले आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्हे बाद केली. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली.
उद्धव ठाकरे यांच्या गटाला'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यात आलं आहे. तर त्यांना'मशाल' हे चिन्ह देण्यात आलं आहे. तसेच शिंदे गटाला'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव देण्यात आलं आहे.
शिंदे गटाने उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. पहिल्या उगवता सूर्य तामिळनाडूतील एका पक्षाचे चिन्ह आहे तर त्रिशूळ व गदा हे धार्मिक चिन्ह असल्याने ही मागणी नाकारण्यात आली. शिंदे गटाला नवीन तीन चिन्हांचा पर्याय देण्यास सांगितले आहे. ठाकरे गटाने त्रिशूळ, उगवता सूर्य व मशाल ही चिन्हे दिली होती. निवडणूक आयोगाने तिसऱ्या पसंती क्रमाचे चिन्ह दिले आहे. तसेच नावही तिसऱ्या नंबरच्या पसंतीक्रमाचे आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तीन नावांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.