जय शहा याने महाराष्ट्रातल्या खेड्यातल्या एखाद्या तरुणासोबत क्रिकेट खेळून दाखवावं: उद्धव ठाकरे यांचं आव्हान
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  जय शहा याने महाराष्ट्रातल्या खेड्यातल्या एखाद्या तरुणासोबत क्रिकेट खेळून दाखवावं: उद्धव ठाकरे यांचं आव्हान

जय शहा याने महाराष्ट्रातल्या खेड्यातल्या एखाद्या तरुणासोबत क्रिकेट खेळून दाखवावं: उद्धव ठाकरे यांचं आव्हान

Nov 10, 2024 01:24 PM IST

ठाकरे घराण्याच्या घराणेशाहीवर टिका करणाऱ्या अमित शहा यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टिका केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा याचे कर्तृत्व काय? त्याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या गावातला तरुण जास्त चांगला क्रिकेट खेळतो, असं ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांची जय शहावर टिका
उद्धव ठाकरे यांची जय शहावर टिका

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यार जोरदार टिका केली आहे. अमित शहा यांच्या घराणेशाहीच्या आरोपाला प्रत्युत्तर देत जय शहा याच्या क्रिकेटमध्ये कामगिरी काय, असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा याचे कर्तृत्व काय? त्याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या गावातला तरुण जास्त चांगला क्रिकेट खेळतो. जय शहाने या नांदेड जिल्ह्यातल्या कंधार-लोहामध्ये यावं आणि इथल्या कोणत्याही तरुणाची बॉलिंग फेस करून दाखवावी किंवा इथल्या बॅट्समनची विकेट काढून दाखवावी. हे माझं जाहीर आव्हान आहे. तरच मी मानेन की पृथ्वीवरच्या सगळ्या क्रिकेट क्लबचा अध्यक्ष जय शहाला करा. अमित शहा तुम्ही मुद्दाचं न बोलता स्वतःचं झाकून ठेवून इतरांचं वाकून काय बघत?’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. अमित शहा हे हृदय नसलेली व्यक्ती असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. नांदेड जिल्ह्यात कंधार-लोहा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार एकनाथ पवार यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

उद्धव ठाकरे म्हणाले, 'अमित शहा एका प्रचारसभेत बोलत होते की उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमत्री करायचे आहे आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचे आहे. अमित शहा, तुम्हाला हदय तर नाहीच आहे. तुम्ही ज्याला कुणाला मानता त्याच्यावर हात ठेवून सांगा की तुम्हाला पंतप्रधान होण्याची इच्छा नाही म्हणून. कुणी कितीही जबरदस्ती केली तरी मी पंतप्रधान होणार नाही, हे तुम्ही शपथ घेऊन सांगा. आणि पहिले त्या जय शहाला क्रिकेट बोर्डावरून खाली उतरवा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी जो बसलाय त्याने काय विराट कोहलीचा विक्रम मोडलाय का? त्याने काय सगळ्यात जास्त विकेट काढल्यात?

महाराष्ट्र मोदींना धुळ चारणारः उद्धव ठाकरे 

नरेंद्र मोदींनी धुळ्यामधून प्रचाराला सुरूवात केली. चांगली सुरूवात केली. आता महाराष्ट्र त्यांना धूळच चारणार आहे. महाविकास आघाडीला चाकं पण नाही आणि ब्रेक पण नाहीत, अशी टीका मोदींनी केली. मोदीजी आमचं सोडून द्या. आमच्याकडे काय-काय आहे आणि काय-काय नाही हे जनता ठरवेल. तुमच्या गाडीला भ्रष्टाचाराची जी चाकं लागली आहे ती पहिलं बघा. इकबाल मिर्ची या दाऊद इब्राहिमच्या माणसाबरोबर ज्याने व्यवहार केला त्या प्रफुल्ल पटेलसह अजित पवारांना तुम्ही मांडीवर बसवला. तुमच्याबरोबर आल्यानंतर मिर्ची गोड झाली. आमच्याबरोबर होते तर मिर्चीचा ठसका लागत होता. आमच्याकडे आहे ते सगळे भ्रष्ट, गुंड आणि तुमच्याकडे आले म्हणजे सगळे साधुसंत. दहा वर्षांमध्ये तुम्ही थापांशिवाय काहीही दिलेलं नाही.' असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

महाराष्ट्रात फक्त ‘ठाकरे गॅरंटी’ चालते

भाजपच्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘भाजपच्या पोस्टरवर एकवेळ मोदींचा फोटो नसेल, अमित शहांचं तर असणंच शक्य नाही. पण बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो मात्र दिसतो. कारण महाराष्ट्रामध्ये मोदींची नासकी, सडकी, गळकी, पडकी गॅरंटी चालत नाही. महाराष्ट्रात फक्त बाळासाहेबांची ’ठाकरे गॅरंटी'च चालते, हे भाजपच्या सुद्धा आता लक्षात आलेलं आहे. तीच गॅरंटी घेऊन मी इथे आलेलो आहे.' असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी शिवसेनेच्या वचननाम्यात सांगितलेल्या ‘शेतकऱ्यांना हमीभाव’, ‘महिलांना प्रती महिना ३ हजार रुपये’, मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण, रोजगार ही वचने उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांसमोर वाचून दाखवली.

माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर उद्धव ठाकरेंची अप्रत्यक्ष टिका

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर टिका केली. ते म्हणाले, 'मी आज जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी आलेलो आहे. आता नुकतेच एक न्यायमूर्ती निवृत्त झाले. लोकशाही मेली तरी चालेल... पण मी निवृत्त झालो… सुटलो बाबा एकदाचा… अरे कसले तुम्ही तिकडे बसला होता. आपल्या देशातली लोकशाही तुमच्याकडे बघत होती. माझा जीव वाचवा… जीव वाचवा… असा टाहो फोडत होती. त्या लोकशाहीला वाचवण्याचं धाडस तुम्ही करू शकलेला नाही. ठिकय तुमचं जे संचित आहे ते तुमच्याकडे. पण आता मला जनतेच्या न्यायालयात न्याय पाहिजे. अडीच वर्षापूर्वी यांनी जी गद्दारा केली, ती माझ्यासोबत नाही, शिवसेनेबरोबर नाही तर तुमच्याबरोबर केलेली गद्दारी आहे. आता महाराष्ट्राच्या जनेतेचं म्हणजेच मविआचं सरकार विधिमंडळात पाठवा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

Whats_app_banner