शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा श्रीरामपूर येथे जनसंवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी मोदींच्या गॅरेंटीवरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. देशात आता कोरोना नाही, मात्र दुसरा हुकुमशाहीचा व्हायरस फोफावतोय. यापासून दोन हात लांब रहिलं पाहिजे. ज्या मातीत सोनं पिकवतात त्याच मातीत शेतकऱ्यांनी या सरकारला गाडावं, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकारेंनी केली आहे.
देशातील शेतकरी आंदोलनावरून उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर सैनिक पाहिजे ते दिल्लीत आहेत, त्यांचे आई वडील शेतकरी आहेत. असे सैनिक शेतकऱ्यांना रोखतात, मोठी भिंत लावतात. रस्त्यावर खिळे ठोकतात. हजारो लाखो शेतकरी दिल्लीच्या बाहेर जमले आहेत. त्यांना आत येऊ दिले जात नाही. ज्यांच्यामतांवर पंतप्रधान झालात ते तुमच्या घरात आलेले चालत नाही का? तारेचे कुंपण आणि बॅरिकेट लावलेत. शेतकऱ्यांवर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडणारे सरकार गोळ्या घालायलाही मागेपुढे पाहणार नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर उद्धव ठाकरे म्हणाले की, अवकाळीचा फटका, दुष्काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी अशोक चव्हाण मोदीच्या दारात गेले आहेत. आज एक भ्रष्टाचारी भाजपमध्ये आला हा भाजपलाच धक्का आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नाही. शिवसेनेला तर अजिबात नाही, कारण असले अनेक धक्के आम्ही पचवले आहेत. सडलेले पान झडल्यानंतर नवे कोंब फुटतात.उपरे आपल्या पक्षात घेणं, ही सूज आहे. भाजप सत्तेच्या मस्तीने सुजलाय. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि खासदारकी, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्रीपद द्यायचे हीच मोदी गॅरंटी आहे का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी जे बोलतो ते करुन दाखवतो, ह्याची साक्ष द्यायला पंतप्रधान कोस्टल रोडच्या उद्घाटनाला येत आहेत. उद्घाटन कुणी का करेना, ते जनतेसाठी केलेलं काम आहे. ती माझी खाजगी मालमत्ता नाही.
संबंधित बातम्या