महाराष्ट्र विधानसभा प्रचारासाठी केवळ एक आठवड्याहून कमी कालावधी शिल्लक राहिल्यानं राजकीय वातावरण तापू लावलं आहे. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना यंदा प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत असून यावरून महायुतीचे नेते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी यांनी लाडकी बहीण योजनेवरून जाहीर सभेत महिलांना धमकी दिली होती.
जर काँग्रेसच्या व महाविकास आघाडीच्या सभेला जाणाऱ्या महिला आढळल्यास त्यांचे फोटो काढून पाठवा, त्यांची व्यवस्था करतो, असं वादग्रस्त वक्तव्य महाडिक यांनी केलं होते. कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजप आमदार अमल महाडिक यांच्या प्रचार सभेत बोलताना महाडिकांनी लाडक्या बहिणींना दमदाटी केली होती. यानंतर विरोधकांनी धनंजय महाडिक यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला आहे.
या वक्तव्यानंतर महाआघाडीच्या नेत्यांनी महाडिकांवर टीकेची झोड उठवली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर घणाघात केला. बार्शीमध्ये झालेल्या प्रचारसभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाडिक यांच्यावर तोफ डागली. ठाकरे म्हणाले की, धमकी देतोस की काय? मुन्ना तुझा हात जागेवर ठेवणार नाही मी, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी धनंजय महाडिक यांना इशारा दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, यांचा माज पाहिला का, यांना वाटते महिलांना १५०० रुपये दिले म्हणजे या आपल्या गुलाम झाल्या आहेत. कोल्हापूरच्या मुन्ना महाडिकाची मस्ती पाहिली का तुम्ही, काय मस्ती आहे, पैसे आमचे घ्याचे आणि सभेला तिकडं जायचं, अरे तु काय तुझ्या घरचे पैसे देतोस काय, तु काय धमकी देतोयस की काय, मी जाहीर सभेत सांगतो फोटो काढून केवळ आमच्या सभेत येतात म्हणून महिलांना धक्का लावला तर, मुन्ना, तुझा हात जागेवर ठेवणार नाही. हेमी जाहीर सभांमधून हे सांगत आहे कारण मला मुन्ना महाडिक माहीत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरेंनी यापूर्वी वाशिममधील सभेमधून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी महाडिक यांच्यावर घणाघाती प्रहार करताना कोल्हापुरचा मस्तवाल महाडिक असा उल्लेख केला.