२०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपने पाठिंबा घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मला दिल्लीत बोलावले व माझ्या सह्या घेतला. त्यावेळी मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे हे त्यांना माहिती नव्हते का? तेव्हा घराणेशाहीबाबत हे का बोलले नाहीत. हे त्यांचे ढोंग आहे. ते जय श्री राम म्हणतात मी त्यांना हरामखोरपणा म्हणतो, अशी जहरी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. चिपळून येथे पार पडलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी बाळासाहेबांचे विचार सोडल्याचं जे म्हणत आहेत. त्यांना मी कमळाबाई म्हणतो. कमळाबाई शब्द माझा नाही तर बाळासाहेबांनी दिला आहे. मी घराणेशाहीवाला आहे, बाळासाहेबांचे विचार माझ्याकडे आहेतच. पंतप्रधान घराणेशाहीच्या विरोधात जे टाहो फोडत आहेत त्यांना प्रश्न आहे २०१४ मध्ये मीच पक्षप्रमुख होतो, आत्ताचे जे सांगत आहेत की हे पक्षप्रमुखच नाहीत. मग तुम्ही पाठिंबा कुणाचा घेतला होता? २०१९ मध्ये मला तुम्ही का बोलवलं होतं? अमित शहा मातोश्रीवर कशासाठी आले होते? त्यावेळी ते मिंध्याकडे का गेले नाहीत?
घराणेशाहीवर बोलणार माणूस घरंदाज असला पाहिजे. त्याने त्याचं घरदार व कुटुंब व्यवस्थित सांभाळलं पाहिजे, मग तो माणूस घराणेशाहीवर बोलला तर मी समजू शकतो. २०१४, २०१९ ला घराणेशाही नव्हती का?
उद्धव म्हणाले की, आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. न्यायालयाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, देशातील सर्वांत मोठे व सर्वांत महत्वाचे न्यायालय जनता न्यायालय आहे. आम्ही पाप केलेले नाही. त्यामुळे जनतेत आम्ही जाऊ शकतो.