मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ठाण्यात उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारं बॅनर उतरवलं

ठाण्यात उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारं बॅनर उतरवलं

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jul 28, 2022 01:33 PM IST

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं बॅनर ठाण्यात लावण्यात आलं होतं.

उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारं बॅनर ठाण्यात उतरवलं
उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारं बॅनर ठाण्यात उतरवलं

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा काल बुधवारी वाढदिवस होता. यानिमित्त राजकीय नेते, मान्यवर व्यक्तींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. अनेक ठिकाणी बॅनर लावून शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान, ठाण्यात लावण्यात आलेल्या बॅनरची चर्चा सध्या होत आहे. ठाण्यात उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे काही बॅनर लावण्यात आले होते. मात्र हे बॅनर ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढून रस्त्याच्याकडेला ठेवल्याचं म्हटलं जात आहे. नेमके कुणी आणि का हे बॅनर काढले याची माहिती मिळू शकली नाही. यावर ठाण्याच्या पालिका अतिक्रमण अधिकाऱ्यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर शिंदे गटासह शिवसेनेच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप गेल्या महिन्याभरापासून सुरु आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या शुभेच्छासुद्धा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. ठाणे महानगरपालिका हद्दीत उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवासाचा उत्साह फारसा दिसला नाही. मात्र ठाण्यातील कोपरी परिसरात उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले होते. पण ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हे बॅनर उतरवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

ठाणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून याबाबत बोलण्यास नकार देण्यात आला आहे. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे ठाणे पालिका प्रशासनावर दबाव आहे का असाही प्रश्न विचारला जात आहे. बॅनर उतरवण्याचे कारण काय हे यामुळे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 

अतिक्रमण विभागाकडून बॅनर उतरवण्याची कारवाई केली गेली तर ते बॅनर रस्त्यावर ठेवले जात नाही. पालिका प्रशासन ते जमा करते. तर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे हे बॅनर मात्र तिथेच बाजूला ठेवण्यात आले होते. त्यामुळे विरोधकांनी हे बॅनर उतरवले असण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. विरोधकांकडून अतिक्रमण विभागाचे नाव पुढे करून हा बॅनर उतरवल्याची चर्चा आता रंगली आहे. 

 

IPL_Entry_Point