राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला रंग भरला असतानाच निवडणूक यंत्रणाही अलर्ट झाली आहे. पोलीस यंत्रणेसह निवडणूक आयोगाचे कर्मचारीही गस्त घालत आहेत. अशातत शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची यांची सलग दुसऱ्या दिवशी बॅग तपासण्यात आली आहे. सोमवारी यवतमाळ जिल्ह्यातील वणी मतदारसंघात प्रचारासाठी गेल्यानंतर हेलिपॅडवरच ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर आज औसा येथे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची बॅग तपासणी करण्यात आली आहे.
या घटनेवर उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच,त्यांचे आयडी आणि अपॉईंटमेंट लेटरही दाखवण्यास सांगितलं. या घटनेचा व्हिडिओ स्वत: उद्धव ठाकरेंनी शुट केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उद्धव ठाकरेंची वणी येथे बॅग तपासल्यानंतर ते चांगलेच संतापले होते. तसेच,माझ्याआधी कोणाच्या बॅगा तपासल्या, मिंधे, मोदी आणि फडणवीस, अजित पवारांच्या बॅगा तपासल्या का, त्यांच्या बॅगा तपासल्याचे व्हिडिओ बनवून मला पाठवा, असेही उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांना म्हटले होते. त्यानंतर, उद्धव ठाकरे धाराशीवला जात असताना पुन्हा एकदा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. औसा येथील हेलीपॅडवर ही तपासणी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर देखील होते.
उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे औसा मतदारसंघातील उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारासाठी आले असता निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांची बॅग तपासण्यात आली. त्यावरुन, उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, आत्तापर्यंत किती जणांची बॅग तपासली असा सवाल संबंधितांना केला. त्यावर, तुम्हीच पहिले आहात असे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले असता, दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक का, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ स्वत:च शुट केला.
औसा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होत असून या सभेसाठी उद्धव ठाकरे औसा मतदारसंघातील नियोजित हेलिपॅडवर आले असता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची बॅग तपासणी केली. विशेष म्हणजे काल सोमवारीच त्यांची बॅग तपासल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी या घटनेचा निषेध करण्यात आला होता. मात्र,आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याआधी मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीच्या सभेला जातानाही उद्धव ठाकरेंनी सुरक्षा रक्षकांना सुनावलं होतं.