मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : राज्याचा गृहमंत्री मनोरुग्ण आहे की काय?; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : राज्याचा गृहमंत्री मनोरुग्ण आहे की काय?; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 10, 2024 03:31 PM IST

Uddhav Thackeray slams Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कुत्र्याविषयीच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे आज जोरदार बरसले.

Uddhav Thackeray attacks Devendra Fadnavis
Uddhav Thackeray attacks Devendra Fadnavis

Uddhav Thackeray targets Devendra Fadnavis : ‘माणसाच्या मृत्यूची तुलना कुत्र्याच्या मृत्यूशी तुलना करणारा गृहमंत्री मनोरुग्णच असला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांची मानसिक तपासणी केली पाहिजे,’ अशी जळजळीत टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या आणि त्यावर गृहमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर ते बोलत होते.

घोसाळकर यांच्या हत्येनंतर विरोधकांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर, एखाद्या गाडीखाली कुत्रा मेला तरी हे माझा राजीनामा मागतील असं फडणवीस म्हणाले होते. मातोश्री निवासस्थानी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला.

'गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुंडांचा हैदोस सुरू आहे. याआधी असं झालं होतं, पण ते गुंड टोळ्यांमधलं गँगवार होतं. आता मात्र सरकारच्या आश्रयानं हे सगळं सुरू आहे. गुंडांना संरक्षण मिळत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

'फडणवीसांच्या वक्तव्यावर मला बोलावसंही वाटत नाही. त्यांच्यावर जर हे बेतलं असतं तर त्यांना कळलं असतं. हा गृहमंत्री लोकांचं संरक्षण करण्यात पुरता अपयशी ठरलाय. देवेंद्र फडणवीसांना मी फडतूस, कलंक बोललो होतो. पण आता शब्दही राहिलेले नाहीत. फडतूस, कलंक हे शब्द सौम्य वाटावेत असं वक्तव्य त्यांनी अभिषेकच्या हत्येबद्दल केलं आहे. त्यांची मानसिक तपासणी करण्याची गरज आहे. राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना 'श्वान' असा शब्द वापरला होता. त्यावरून उद्धव यांनी सडकून टीका केली. 'कुत्रा म्हणायच्या ऐवजी फडणवीसांनी श्वान शब्द वापरला. संस्कृत शब्द वापरला म्हणजे माणूस सुसंस्कृत होत नाही. गृहमंत्री म्हटल्यानंतर त्याच्यावर कुत्र्याचीच काय, राज्यातील सर्व प्राण्यांच्या जिवाची जबाबदारी असते. माणसांचं सोडूनच द्या. पण इथं एका नागरिकांचा खून होतो आणि त्याची बरोबरी हे कुत्र्याशी करतात? हा निर्घृण मनाचा आणि निर्ढावलेला गृहमंत्री आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दिल्लीत तुमची ओळख काय आहे लोकांना माहीत आहे!

‘राज्यात काही अनुचित घटना घडल्यास संबंधित मंत्र्याला जबाबदार धरलं जातं, त्याचा राजीनामा मागितला जातो ही सर्वसाधारण पद्धत असते. एखाद्या मंत्र्याकडून कारभार होत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याला दूर करायला पाहिजे. पण त्यांच्यात कोणातही तशी हिंमत नाही. दिल्लीत जाऊन हे लोक शेपट्या हलवतात. तिकडं तुम्ही श्वान आहात, कुत्रे आहात की आणखी कुणी आहात याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. लोकांनी काय ओळखायचं ते ओळखलं आहे, असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरे यांनी हाणला.

WhatsApp channel