Uddhav Thackeray on Maharashtra Bandh : बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं शनिवार, २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील जनतेला बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं.
मुंबईतील शिवसेना भवनात त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. बदलापूरमधील घटनेचा उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात निषेध केला. 'या घटनेची केवळ निंदा करून भागणार नाही. या घटनेमुळं जनतेच्या मनात प्रचंड खदखद आहे. जनतेच्या मनात एक उद्वेग आहे. या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीनं २४ ऑगस्टला बंद पुकारला आहे. राज्यातील सर्व जनतेनं उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी व्हावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.
‘हा कोणत्याही राजकीय पक्षाचा बंद नाही. आपल्या माता-भगिनींसाठी आपण किती जागृत आहोत हे दाखवणारा हा बंद आहे. विकृतांच्या मनात दहशत बसवण्यासाठी हा बंद आहे. संवेदनाहीन व्यवस्थेच्या विरोधात हा बंद आहे. आम्हीही काहीही करू हे चालणार नाही हे दाखवण्यासाठी हा बंद आहे. कुणीही असं दुष्कृत्य करण्यास धजावू नये आणि असं काही झालंच तर त्याला ताबडतोब शिक्षा व्हावी यासाठी हा बंद आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
‘अशा घटना घडल्या की काही दिवस लोक आक्रमक होतात, नंतर सगळं थंड होतं. मात्र, आता थंड बसून चालणार नाही. हे सरकार हलत नाही, केवळ राजकारण करत आहे. करोनाच्या काळात जसा महाराष्ट्र एक कुटुंब म्हणून लढला होता, त्याच प्रकारे या विकृतीविरोधात महाराष्ट्राला कुटुंब म्हणून लढावं लागेल,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ‘बदलापुरात इतकी भयंकर घटना घडली. लोकांचा उद्रेक झाला. तो शमवण्याऐवजी व योग्य कारवाई करण्याऐवजी सरकारकडून लोकांना दोष दिला जात आहे, याबद्दल उद्धव यांनी संताप व्यक्त केला. 'हे सगळं सुरू असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठं होते? हे मुख्यमंत्री रत्नागिरीत राजकीय कार्यक्रमात दंग होते. राख्या बांधून फोटो काढणारे महिलांच्या सुरक्षेसाठी काय करतायत, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. आमच्यासाठी सुरक्षित बहीण हीच प्राथमिकता आहे. त्यामुळंच जात-पात, धर्म विसरून लोकांनी बंदमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.