संयमी व शांत स्वभाव अशी ओळख असलेले उद्धव ठाकरे आज वेगळ्याच अवतारात पाहायला मिळाले. बीकेसीमधील महाविकास आघाडीच्या सभास्थळी पोहोचल्यानंतर त्यांच्यासोबत व्हीआयपी गेटमधून सुरक्षारक्षकांना जाण्यास मुंबई पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच भडकल्याचे दिसले. आत घ्या सगळ्यांना पहिला, कोण आहे तो त्याचं नाव घ्या असं म्हणत उद्धव ठाकरे पोलिसांवर संतापल्याचे दिसले. शेवटी एका पोलिस अधिकाऱ्याच्या विनंतीनंतर उद्धव ठाकरे सभेच्या ठिकाणी निघून गेले.
बीकेसी मैदानावर आयोजित महाविकास आघाडीच्या प्रचार सभेसाठी जाताना बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी फक्त उद्धव ठाकरेंनाच व्हीआयपीगेटमधून आत सोडलं. मात्र त्यांच्या सोबत आलेल्यांना पोलिसांनी रोखलं. सहकाऱ्यांसह सुरक्षारक्षकांना आत सोडण्यास नकार दिल्यामुळे पुढे निघून गेलेले उद्धव ठाकरे माघारी आले आणि पोलिसांवर संतापले. ‘आधी सगळ्यांना आत घ्या, कोण आहे तो? मूर्खासारखं बोलतो, त्याचं नाव घ्या’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पोलिसांना जाब विचारला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मध्यस्थी करत उद्धव ठाकरेंना शांत केले. त्यानंतर पोलिसांनी आदित्य ठाकरे आणि इतर सुरक्षारक्षकांना व्हीआयपीगेटमधून आत सोडलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्समध्ये महाविकास आघाडीकडून प्रचारसभेचे आयोजन केले होते. या सभेसाठी महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, नाना पटोले आणि इतर नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सभास्थळी जात असताना बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी उद्धव ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांना अडवले. सुरक्षा रक्षकांना आत जाण्यास प्रवेश पोलिसांना नाकारला. यावेळी उद्धव ठाकरे पोलिसांवर भडकले व सर्वांना आत सोडण्यास सांगितले. उद्धव ठाकरे संतापल्याने गेटवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी उद्धव ठाकरे संतापले आणि ते पोलिसांना उद्देशून म्हणाले की, कोण आहे तो? त्याचं नाव घेऊन ठेवा.
महाआघाडीची सभा पार पडल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे त्यांच्या गाडीचे चालक आणि शिवसैनिकांमध्ये काहीशी बाचाबाची झाली. जवळपास तीन ते चार मिनिटे हे भांडण सुरू होते. हे पाहून काँग्रेस आणि सेनेचे कार्यकर्तेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर दोन्ही बाजूकडील तणाव निवळला. प्रमुख नेते व्हीआयपी एक्झिट गेटने बाहेर पडले. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे एकाच कारमधून जाणार होते. त्यांच्या गाडीच्या चालकांची शिवसैनिकांसोबत काहीशी बाचाबाची झाली.